जाहिरात

Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर जीवाशी खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका

Samruddhi Mahamarg News: जालना जिल्ह्यातील कडवंची जवळ समृद्धी महामार्गावर जीव धोक्यात घालून द्राक्ष विक्री सुरू असून, लहान मुलांनाही या धोकादायक कामात ओढले गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर जीवाशी खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका

 Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. हायस्पीड' प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सध्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ चक्क मुख्य रस्त्याच्या लेनवर येऊन द्राक्ष विक्रीचा अवैध धंदा सुरू आहे. 'एनडीटीव्ही' मराठीच्या कॅमेऱ्यात हा थरार कैद झाला असून, यामुळे मोठ्या अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

हातात द्राक्ष घेऊन वाहनांसमोर धाव

या परिसरात सुमारे 40 ते 50 लोकांची टोळी सक्रिय आहे, जी महामार्गावर येऊन फळ विक्री करत आहे. रस्त्याने जाणाऱ्या वेगवान वाहनांना द्राक्ष दिसावीत, म्हणून हे विक्रेते थेट लेनवर येतात आणि हातात द्राक्षांचे घोस घेऊन वाहनचालकांना दाखवतात. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या जीवघेण्या कामात लहान मुलांनाही रस्त्यावर उभे करण्यात आले आहे. भरधाव गाड्यांच्या वाऱ्याने ही मुले कधीही अपघाताची बळी ठरू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

Exclusive VIDEO

सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह

समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे थांबण्यास किंवा फिरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही महामार्गावर सतत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना हा सर्रास सुरू असलेला प्रकार दिसत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. हे विक्रेते महामार्गाच्या कडेला असलेले लोखंडी कुंपण ओलांडून किंवा तोडून आत येत असल्याचे समजते.

(नक्की वाचा-  Pune Traffic News: गुगल मॅप्सच्या मदतीने पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांचे नवे 'स्मार्ट' पाऊल)

समृद्धी महामार्गावर आधीच अपघातांचे प्रमाण जास्त आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कडवंची भागातील ही 'द्राक्ष विक्री' प्रवाशांच्या जिवावर बेतणारी ठरू शकते. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com