Samruddhi Mahamarg: जन्म 1985 चा, जमीन 1971 ची? दानवेंनी सादर केले 'महाघोटाळ्या'चे पुरावे, प्रकरण काय?

Samruddhi Mahamarg Land Scam: छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ambadas Danve: सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यासाठी चक्क 1150 कोटी रुपयांचा महाघोटाळा रचला गेल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर:


Samruddhi Mahamarg Land Scam: छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनी बळकावल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्यासाठी चक्क 1150 कोटी रुपयांचा महाघोटाळा रचला गेल्याचा दावा दानवे यांनी केला असून, यामध्ये खासदारांच्या ड्रायव्हरचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलाशांमुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा भागात 23 एकर 30 गुंठे जमीन आहे, जी महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली होती. समृद्धी महामार्गासाठी या जमिनीचे अधिग्रहण करण्याचे आदेश झाले आणि त्यानुसार या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या जमिनीचा कोणताही कायदेशीर वारसदार समोर आला नव्हता. 

मात्र, एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट होताच, अचानक काही लोकांनी या जमिनीवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आणि पैशांची मागणी केली. यातूनच या मोठ्या घोटाळ्याचा वास येत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: 'आमच्यात काहीच घडलं नाही'; पतीची कोर्टात लेखी कबुली आणि पुण्याच्या एका लग्नाचा असा झाला शेवट )

जन्म 1985 मध्ये आणि जमिनीचा व्यवहार 1971 ला?

अंबादास दानवे यांनी या प्रकरणात एक तांत्रिक आणि अत्यंत धक्कादायक पुरावा सादर केला आहे. या जमिनीचा हिबानामा (मुस्लिम पद्धतीनुसार जमीन दुसऱ्याच्या नावावर करणे) जावेद रसूल शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आला आहे. कागदपत्रांनुसार हा हिबानामा 1971 मध्ये झाल्याचा दावा केला जात आहे. 

मात्र, दानवे यांनी पुराव्यासह सांगितले की, ज्या जावेदच्या नावे हा व्यवहार झाला, त्याचा जन्मच 1985 मध्ये झाला आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म होण्यापूर्वीच 14 वर्षे आधी त्याच्या नावावर जमीन कशी होऊ शकते, असा खोचक सवाल दानवे यांनी उपस्थित केला असून हा निव्वळ जादूचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
 

खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरचा व्यवहारात संबंध काय?

ज्या जावेद रसूल शेखच्या नावावर हा कोट्यवधींचा व्यवहार सुरू आहे, तो खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर होता. दानवे यांच्या दाव्यानुसार, यापूर्वीही याच ड्रायव्हरच्या नावावर 400 कोटी रुपयांचे एक हिबानामा प्रकरण समोर आले होते, जे खासदार भुमरे यांनीच केले होते. 

आता समृद्धी महामार्गाच्या या जमिनीतही खासदारांनी मोठी खेळी केली असून, आपल्या ड्रायव्हरच्या नावाने 1150 कोटी रुपये हडपण्याचा हा मोठा कट असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. मृतांच्या नावावर कागदपत्रांची फेरफार करून सरकारी पैसा लाटण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement

सीआयडी चौकशीची मागणी आणि मुख्यमंत्र्यांना पत्र

अंबादास दानवे यांनी या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे जोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार सुरू असून चालक हा केवळ एक प्यादा आहे, खरा वजीर मागेच दडलेला आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि दोषींना तात्काळ तुरुंगात धाडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सीआयडी चौकशी झाल्यास खासदार भुमरे यांचे सर्व कारनामे बाहेर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.