- 11 वर्षीय भावाने 9 वर्षीय बहिणीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवलं.
- 11 वर्षीय मुलाचे सर्वत्र होतंय कौतुक
- बिबट्याने 9 वर्षीय मुलीची मान धरली होती, अन्...
Sangli News: लाडक्या बहिणीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणाऱ्या 11 वर्षीय मुलाचे सर्वत्र कौतुक होतंय. सांगली जिल्ह्यातील उपवळे गावामध्ये बुधवारी (7 जानेवारी) थरारक घटना घडली. संग्राम पाटील या गावकऱ्याच्या घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने 9 वर्षीय मुलीवर झडप घातली आणि तिला नेण्याचा प्रयत्न केला. पण मुलीच्या 11 वर्षांच्या भावानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून बाहेर आणले आणि मृत्यूच्या दाढेतून तिची सुखरूप सुटका केली. स्वरांजली पाटील असे 9 वर्षीय मुलीची नाव आहे.
रात्री नेमके काय घडले?
उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे घर आहे. बुधवारी (7 जानेवारी 2026) रात्री जेवण करून झाल्यानंतर शिवम आणि स्वरांजली हे भाऊबहीण एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. त्यावेळेस घरांच्या मधील जागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वरांजलीवर हल्ला करत तिची मान धरली. पण शिवम घाबरला नाही कारण त्याला फक्त बहिणीचा जीव वाचवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. धाडस करून शिवमने बहिणीचे पाय पकडून तिला मागे ओढले. बिबट्याने दोघांना काही अंतर फरफटत नेले, पण शिवमने बहिणीचा पाय सोडला नाही. मुलांच्या आईनेही आरडाओरडा केला. लोकांची गर्दी पाहून बिबट्याने मुलीला सोडले, पळ काढला.
स्वेटर-टोपीमुळे गंभीर जखम झाली नाही
स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातलेली होती, त्यामुळे बिबट्याचे दात तिच्या मानेच्या भागात रूतले नाही. पण तिच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. यानंतर दोन्ही मुलांना तातडीने उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बहिणीला वाचवणाऱ्या 11 वर्षांच्या शिवम पाटीलच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world