Sangli News : सांगलीतील कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचा धक्कादायक Video; पळापळा अन् आरडाओरडा, विद्यार्थी भयभीत

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डांगे कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भव्य मंडप अक्षरश: पत्त्यासारखा उडून गेला आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. (Storm at Dange College's Annual Gathering)

मैदानात धुरळ्याचे लोट...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेला प्रचंड मोठा कापडी मंडप वाऱ्याच्या प्रचंड वेगाने आकाशात झेपावत आहे. मंडपाचे कापड फाडून खांब जमिनीवरून उखडले जात आहेत. ज्यामुळे मैदानात धुरळ्याचे लोट उठताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडालेली स्पष्ट दिसत असून 'पळा पळा' अशा आवाजांनी एकच गोंधळ उडालेला ऐकू येत आहे.

Advertisement

नक्की वाचा - 'मी पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही'; आत्महत्येपूर्वी बापाची हळहळ; लेकीचा रिप्लाय वाचून अंगावर काटा येईल

विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले...

शुक्रवारी सकाळी मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वातावरण झालं. व्हिडिओमध्ये दिसत असलेली दृश्ये पाहता, मोठी दुर्घटना टळल्याचं समोर आले आहे. महाविद्यालयाच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु मंडप आणि ध्वनी व्यवस्थेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. हा व्हिडिओ सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून निसर्गाच्या कोपाचा प्रत्यय देणारा हा व्हिडिओ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.