Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?

Sangli News : सांगली जिल्ह्यात आज (मंगळवार, 19 ऑगस्ट) नवस फेडण्याची शेकडो वर्षांची प्रथा पाहायला मिळाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी या दाम्पत्याला मुलगा झाला.
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

लग्नानंतर विवाहित जोडप्याला मुल कधी होणार असा प्रश्न अनेकजण विचारतात. काही जणांना मुल लवकर होत नाहीत. त्यांना उपचार करावे लागतात. अनेक उपाय करुनही मुल होत नसलेल तर संबंधित जोडपं डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच श्रद्धेचाही आधार घेतं. त्यासाठी काही नवस बोलले जातात. एका अनोख्या नवसाची सध्या सांगलीमध्ये चर्चा आहेय

सांगली जिल्ह्यात आज (मंगळवार, 19 ऑगस्ट) नवस फेडण्याची शेकडो वर्षांची प्रथा पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर नवसाने मुलगा झाला. यानंतर कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत नवस फेडण्यात आला. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी वाढत असतानाच आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात त्यांनी हा नवस पूर्ण केला.

(नक्की वाचा : Rain Alert : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद! 'या' मार्गाचा करा वापर )

कुणी केला होता नवस?

कर्नाटकातील निप्पाणी गावात राहणारे रवींद्र वळावे या दाम्पत्याचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.  लग्नानंतर अनेक वर्षे लोटली तरीही दांपत्याला मुलं होत नव्हतं.अनेक प्रयत्न करुन हे दाम्पत्य थकले.रवींद्र वळावे यांचे आजोळ हे सांगली. या आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पुर्वापार चालत असलेल्या परंपरेबाबत माहिती दिली. त्यानंतर वाळवे दाम्पत्यानं सांगलीमध्ये येऊन चार वर्षांपूर्वी मुल होण्यासाठी नवस बोलला होता. 

या नवसानंतर त्यांना एक मुलगा झाला. यानंतर हे दाम्पत्य नवस फेडण्यासाठी कुटुंबियांसह सांगलीतील सरकारी घाटावर आले होते. कृष्णा माईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या मदतीने पाळणा सजवण्यात आला. कृष्णेच्या पाण्यात नेहमी पोहणारे आंबी यांची मदत घेऊन नवस फेडण्याची लगबग सुरु झाली. कृष्णा काठावरील स्वामी समर्थ घाटाजवळून सजवलेल्या पाळण्यात वीर या मुलाला नारळ घेऊन बसवण्यात आले. स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा वाहत्या पाण्यातून प्रवास करत नवस फेडण्यात आला.

Advertisement

कोयना धरण क्षेत्रासह सांगली आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे.या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.असे असले तरी नेहमीच कृष्णा माईची सेवा करणाऱ्या आंबी समाजाच्या तरुणांनी धाडसाने वाहत्या पाण्यात नवस फेडण्याची शिवधनुष्य यशस्वी रित्या पेलले. 

 यावेळी आंबी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  'मूल होत नसेल तर त्यांनी हा नवस बोलण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी आंबी समाजाच्या मदतीने पूर्ण करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा क्वचितच काही जणांना माहित आहे.'

Topics mentioned in this article