
शरद सातपुते, प्रतिनिधी
सध्या सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये (Sangli Krishna River News) बाळाला सोडून पूर्ण केलेल्या नवसाची सध्या महाराष्ट्रभरात मोठी चर्चा सुरू आहे. कृष्णा नदीला पूर आलेला असताना कर्नाटकातील निप्पाणी गावचे रहिवासी रवींद वळावे या दाम्पत्याने आपल्या बाळाला कृष्णा नदीच्या पुरात सोडलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर विवाहित जोडप्यात मूल होत नव्हतं. रवींद्र वळावे यांचे आजोळ हे सांगली. या आजोळी असणाऱ्या नातेवाईकांनी त्यांना पुर्वापार चालत असलेल्या परंपरेबाबत माहिती दिली. त्यानंतर वाळवे दाम्पत्यानं सांगलीमध्ये येऊन मुल होण्यासाठी नवस बोलला होता. यासाठी त्यांनी कृष्णामाईला नवस केला.
नवस केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांना मूल झालं. कृष्णामाईमुळेच हे मूल आपल्या पदरात पडल्याची त्यांची भावना आहे. त्यांना लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी मूल झालं होतं. अखेर 19 ऑगस्ट रोजी नवस फेडण्यासाठी ते कृष्णा नदीच्या काठावर पोहोचले. कृष्णा नदीला पूर आला होता. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी वाढली होती. मात्र आंबी समाजाच्या मदतीने त्यांनी वाहत्या पाण्यात आपला नवस पूर्ण केला.

नवस करणारे रवींद्र वळावे आणि त्यांची मुलगा वीर वळावे
सांगलीतील शेकडो वर्ष जुनी परंपरा काय आहे?
मूल होण्यासाठी कोणी वैद्यकीय आधार घेतं तर कोणी देवी-देवतांना नवस करतात. अनेकदा १०१ नारळ वाहणे, किंवा चालत तत्सम देवस्थानपर्यंत जाण्याचा नवस केला जातो. मात्र सांगतील शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. ज्याला 'पाळणा धरणे' असं म्हलं जातं. सांगतीलील नागरिक कृष्णा नदीला देवीसमान मानतात आणि तिची पूजा करतात. कृष्णा नदीला कृष्णामाई म्हणण्याची पद्धत आहे. या कृष्णा माईसमोर मूल-बाळ व्हावं यासाठी नवस मागितला जातो. जेव्हा हा नवस पूर्ण होईल त्यानंतर मूल कृष्णा नदीत सोडण्याची परंपरा आहे. यासाठी लाकडी पाळणा तयार केला जातो. या पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं जातं. आणि स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा ३०० मीटरचा प्रवास करीत नवस फेडला जातो.
आंबी समाजाची मोठी मदत
राज्यभरातून कानाकोपऱ्यातून लोक येथे नवस फेडण्यासाठी येत असतात. कृष्णामाईला नवस केल्यानंतर तो फेडण्यासाठी येथील आंबी समाजाकडून मदत केली जातो. आंबी समाज नदीत सेवा करण्याचं काम करतात. पाळणा कृष्णा नदीत सोडण्याचा आणि तो फिरवून आणण्याचं काम आंबी समाजाकडून केलं जातं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world