सांगलीमध्ये काँग्रेस सहयोगी खासदार विशाल पाटील आणि शिवसेना गटामध्ये चांगलीची जुंपली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांना महाविकास आघाडीत घ्यायचा अधिकार विशाल पाटलांना कोणी दिला? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूतेंनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
विशाल पाटील हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी घातक असून काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांना देखील ते भावी मुख्यमंत्री म्हणून राजकारणातून संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप संजय विभूतेंनी केला आहे. खासदार विशाल पाटलांनी संजय विभुते यांच्यावर टीका करताना काही नेत्यांना टीव्हीवर दिसण्याची हौस असते, असा टोला लगावला. खानापूर आटपाडी विटा मतदारसंघातून सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण करत महायुतीच्या पाठिंब्याच्या विधानाचं खंडन केलं होतं. यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूतेंवर विशाल पाटलांनी टीका केली आहे.
नक्की वाचा - आधी सत्ता, मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा! उद्धव ठाकरेंची मागणी काँग्रेस हायकमांडने धुडकावली
त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत विशाल पाटलांचं बोलणं झाले असेल तर, त्यांनी आपल्या सोबत मातोश्रीवर येऊन स्पष्ट करावं, आपण आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेऊ, असं जाहीर आवाहन देखील खासदार विशाल पाटलांना केले आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीचा युतीधर्म डावलून विशाल पाटील यांनी सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकलीसुद्धा. या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीलाच डबल महाराष्ट्र केसरी वितेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतरही विशाल पाटील यांच्याकडून बरेच प्रयत्न करण्यात आले, मात्र तिकीट मिळत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.