Sanjay Raut Health : खासदार संजय राऊतांची सकाळची पत्रकार परिषद आता दोन महिने होणार नाही... कारण, संजय राऊत आजारी आहेत. प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झाल्याची माहिती स्वत: राऊतांनीच दिली आहे. राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय... स्वपक्षीयांसोबत सर्वच पक्षातील नेत्यांनी राऊत लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केलीय. पंतप्रधान मोदींनीही राऊतांसाठी प्रार्थना केलीय... त्यामुळे राऊतांना नेमकं झालंय काय? असा प्रश्न आता विचारला जातोय....
सकाळच्या पत्रकार परिषदेनं सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरवणारे...सकाळच्या पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांची खुर्ची गदागदा हलवणारे...आणि सकाळच्याच पत्रकार परिषदेतून उभी फूट पडलेल्या शिवसेनेला पुन्हा उभारी देणारे संजय राऊत पुढील दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. खुद्द संजय राऊतांनीच तशी माहिती दिली आहे. आपल्या लेटरहेडवरुन संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय, की...
नक्की वाचा - Mumbai Crime News: डबलडेकर बस हायजॅक, सामान्यांना ओलिस ठेवणाऱ्या 'राज'चा एन्काउंटर, रक्तरंजित थराराने मुंबई हादरली
राऊतांचं भावनिक पत्र...
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र!
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बसा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
राऊतांना नेमकं काय झालंय?
संजय राऊतांनी सोशल मीडियावर हे पत्र टाकल्यामुळे राऊतांना नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न आता विचारला जातोय. साधारण दोन आठव्यापूर्वी संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना तातडीने भांडूपच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या आधी त्यांची रक्त तपासणीही करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. संजय राऊत यांच्यावर नोव्हेंबर 2019 मध्ये एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. तशा अवस्थेतही त्यांनी सामनाच्या अग्रलेखाचं काम हाती घेत सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती. त्यातून त्यांना आरामाची गरज असल्याचं सांगितलं जात आहे.
दोन महिन्यांचा ब्रेक...
गेल्या काही दिवसात राऊतांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत होतं. मात्र, तरीही शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यासाठी राऊत ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसात सरकारमधील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, महिल्या अत्याचारावरुन राऊतांनी सरकारचे वाभाडे काढणं सुरुच ठेवलं. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या निर्मितीत संजय राऊतांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. शरद पवार आणि काँग्रेसला सोबत घेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, त्यात राऊतांचा मोठा हात होता. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुटून पडण्याच्या राऊतांच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर राऊत कायम असायचे. मात्र, आता दोन महिने तरी राऊत सार्वजनिक जिवनातून दूर राहणार आहेत. त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या मनसेच्या आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या मोर्चातही राऊत दिसणार नाहीत. दरम्यान, संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होईल आणि पुन्हा एकदा सकाळच्या पत्रकार परिषदेतून ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना दिसतील, हीच अपेक्षा.