Sanjay Raut: मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता काय घडणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने नाशिकचे राजकारण तापले

Nashik MLC Election: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने सध्या नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nashik MLC Election:  संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
नाशिक:

योगेश पाटील, प्रतिनिधी

Nashik MLC Election:  राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हटलं जातं, पण जेव्हा दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी छुपी हातमिळवणी करतात तेव्हा राजकीय गणितं पूर्णपणे कोलमडून पडतात. नाशिकच्या राजकीय आखाड्यात सध्या असंच काहीसं चित्र पाहायला मिळत असून एका गुप्त युतीची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. 

विधान परिषदेच्या या अटीतटीच्या लढाईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धोबीपछाड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने  थेट भाजपाशी जवळीक साधल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. उघडपणे एकमेकांवर टीका करणारे हे दोन पक्ष पडद्यामागे नक्की काय शिजवत आहेत, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement

महायुतीतील धुसफूस आणि ठाकरेंची एन्ट्री

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेलीय. तर त्याला भाजपाच्या बंडखोर उमेदवाराने आव्हान दिले. महायुतीतील या विसंवादाचा फायदा उठवण्यासाठी ठाकरे गटाने अत्यंत सावध हालचाली सुरू केल्या आहेत. 

विशेष म्हणजे, या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. मात्र, उमेदवारी न देऊनही ठाकरे गट या निवडणुकीचा 'किंगमेकर' ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

( नक्की वाचा : Eknath Shinde : परभणीत शिंदेंची शिवसेना बदलली? 'बाण' आणि 'खान एकत्र! काय आहे कारण? )
 

संजय राऊत यांच्या वक्तव्यानं खळबळ

खासदार संजय राऊत यांच्या एका ताज्या वक्तव्याने नाशिकमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू शिंदे सेना आहे, असे स्पष्ट करत राऊत यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राऊत यांनी शिंदे सेनेवर तोफ डागली असली तरी भाजपाबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. 

मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता आमच्या नगरसेवकांना आदेश दिले जातील, असे सांगत त्यांनी सस्पेन्स आणखी वाढवला आहे. राऊत यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे नगरसेवक भाजप समर्थक किंवा बंडखोर उमेदवारांच्या पारड्यात आपली मते टाकणार का, अशी चर्चा रंगली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : सातबारा कोरा होणार! शेतकरी कर्जमाफीचे स्वरूप नक्की काय? कोणाचे कर्ज होणार माफ? वाचा 'A to Z' माहिती )

नाशिकमधील आकड्यांचे गणित

नाशिकमध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे ठरवण्यात ठाकरे गटाची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. ठाकरे गटाकडे नाशिकमध्ये तब्बल 52 नगरसेवक आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत हे 52 मतदार ज्या बाजूला झुकतील, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. 

ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना किंवा त्यांच्या समर्थित उमेदवारांना मतदान केले, तर शिंदे सेनेला हा मोठा धक्का मानला जाईल. शिंदेंची शक्ती कमी करण्यासाठी ठाकरे भाजपला साथ देणार की तिसराच कोणता मार्ग निवडणार, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Advertisement

सत्ताधारी गोटातून पलटवार

ठाकरे गटाच्या या संभाव्य चालीवर शिंदे सेनेकडूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मात्र, पडद्यामागे शिंदे गटही आपल्या नगरसेवकांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असल्याचे समजते. 

महायुतीतील ही उघड लढत आणि त्यात ठाकरेंची झालेली ही एन्ट्री यामुळे नाशिकच्या राजकारणात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Topics mentioned in this article