स्वानंद पाटील, प्रतिनिधी
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याला मराठा नेते मनोज जरांगे पाटील तसंच संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. देशमुख यांच्या मारेकऱ्याला तातडीनं अटक करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यानी साप पोसू नये, असं इशाराही त्यांनी यावेळी दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले जरांगे?
जरांगे पाटील या सभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच सर्वपक्षीय व्यासपीठावर आले होते. तो संदर्भ देत जरांगे म्हणाले की, मी जास्त बोलणार नाही. मी काय करतो, काय करणार यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे महत्त्वाचं आहे. पण, तुमच्या गोतावळ्यात मी पहिल्यांदाच बसलोय. माझ्या जातीवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडत नाही. मी कुणाचं नाव काय घेऊ, एकटाच सुरेश धस अण्णा काफी आहे, असं त्यांनी सांगितलं.
' जो आमदार, जो खासदार, जो सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल त्याच्या बाजूनं ठामपणे जातीच्या सर्वांनी उभा राहायचं. तो कुणाचाही असो, आपलं वैयक्तिक काही असेल तर नंतर पाहू. त्याच्या पाठीमागे समाजानं ठामपणे उभा राहावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं.
( नक्की वाचा : सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी! सुरेश धस यांनी सांगितला 'आकाचा' परळी पॅटर्न )
सरकार तुमचं, लफडं तुमचं, माझी एक विनंती आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते इथं आहेत. राजे साक्षीला आहेत. तुम्हीच मुख्यमंत्र्यांकडे जा या यादीमध्ये जितके लोकं आहेत त्यांना अटक करा. त्यानंतर मोर्चाची गरज काय? त्यांच्या मागील 'हाका' धरा, 'हाकीन' असेल तरी ती धरा. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत.
संतोष देशमुखांच्या लेकरांना दारात बाप दिसत नाही. त्यांनी बापाचं छत्र हरवलं. तुमचे-आमचे भाषणं होत राहतील, तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात उभे राहा. हे आंदोलन राज्यभर पसरलं पाहिजे,' असं जरांगे म्हणाले.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )
आता वाट बघायची नाही. कुणी आपल्यावर हल्ला केला तर जशास तसं उत्तर द्या. हे सर्व आरोपी सापडणे काही मोठी गोष्ट नाही. त्यांना अटक केल्यानंतर एकही शब्द मुख्यमंत्र्यांना बोलणार नाही, हा जनतेसमोर शब्द आहे. पण, त्यांना धरलं नाही तर कचाकच घोडे लावीन असा इशारा जरांगे यांनी दिला.
आमच्या कार्यकर्त्यांनी नुसती कमेंट केली तर तुम्ही गुन्हे दाखल केलेत आणि तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. जातीवादी मंत्री पोसणार असतात तर आम्ही हातात दंडुके घेणार. तुम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटा आणि आरोपींना अटक करायची मागणी करा, संतोष भैय्यांना न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातील कुणीही मागे सरकायचं नाही असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी साप पोसू नये, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.