मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप आणि प्रकरणे समोर येत असून आता वाल्मिक कराडचे प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयामध्ये वाल्मिक कराडविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी थेट नाव आल्याने धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याकडून धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ईडी प्रतिवादी असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून, खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची ईडीकडून समांतर तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी व्यवहार मंत्रालयाकडून मिळवलेल्या कागदपत्रानुसार मुंडे आणि कराड एकाच खाजगी कंपनीत सहसंचालक आहेत. धनंजय मुंडे यांच्या खाजगी संस्थेत वाल्मीक कराड सहसंचालक आहे, याबाबत लेखापरीक्षकांकडून रजिस्टर कॉपी मिळवली असल्याचा तिरोडकर यांचा दावा आहे. तसेच धनंजय मुंडे संस्थापक/संचालक असलेल्या जगमित्र साखर कारखाना, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कराड सह संचालक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
तसेच एसआयटी वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत आहे. मात्र, हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबविला जातो असंही याचिकेत म्हटले असून व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मिक कराडचे बेकायदा धंदे सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा - Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्या कधी आहे? त्या दिवशी मौनाचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे काय?
दरम्यान,मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरुन धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष आणि अजित दादा यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल, माझ्याविषयी काय करायचे ते तेच ठरवतील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेते आणि धनंजय मुंडेंसोबत बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world