बीड: राज्यात सध्या संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत असून या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याचे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात संबंध आहे का? याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. याच प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता आवादा कंपणीच्या खंडणी प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मस्साजोगमधील अधिकाऱ्याला खंडणीची मागणी केल्याच्या आरोपावरुन वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड याचे संभाषण झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता हे धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागल्याचे समोर आले आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र मिळून अधिकाऱ्यांना धमकावल्याचे दिसत आहे. काम सुरु ठेवायचे असेल तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा हातपाय तोडू... असा कॉल विष्णू चाटेच्या फोनवरुन करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तसेच वाल्मिक अण्णा बोलतील, असाही संवाद या मोबाईलमध्ये आहे. आता हा आवाज विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचा आहे का? याबाबतचा तपास सीआयडी करत आहे. या खंडणी प्रकरणात विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने याआधीच घेतले आहेत तसेच या धमकी प्रकरणी आरोपी वाल्मीक कराड याचे व्हाइस सॅम्पल बुधवारी घेतलेत.
( नक्की वाचा : 30-30 Scam : पोत्यानं पैसे देणाऱ्या संतोष राठोडनं मराठवाड्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कसा केला? )
आता हे सर्व आवाजाचे नमुने आणि दिलेली धमकी ही वाल्मिक कराड, विष्णू चाटेचीच आहे का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. हे आवाजाचे नमुने वाल्मिक कराडच्या आवाजाशी जुळल्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे सीआयडीच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणातील विष्णू चाटेच्या कोठडीची मुदतही आज संपणार आहे.