स्वानंद पाटील, बीड
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू चाटे याच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती असल्याची माहिती समोर येत आहे. तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र तपास समाधानकारक सुरू आहे ,असं मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ही धनंजय यांनी केली. संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, असे देखील धनंजय देशमुख म्हणाले. त्यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहावर CID चे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. तपासाच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती देखील देशमुख यांनी दिली.
धनंजय देशमुख यांनी काल एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. केज येथील विश्रामगृहात ही भेट झाली. धनंजय देशमुख यांनी आष्टी येथे जाऊन आमदार सुरेश धस यांचीही भेट घेतली. यावेळी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीचे मागणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तपासामध्ये कुठली बाब राहू नये यासाठी चर्चा केली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.