फलटण इथल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. डॉक्टर तरुणीची हत्या की आत्महत्या याबाबत चर्चाही होत आहे. आपल्याला मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याचा आरोप करत तरुणीने आत्महत्या केली होती. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. शिवाय तिला त्रास देणाऱ्यांमध्ये काही राजकीय कनेक्शन असल्याची चर्चाही होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांशी संपर्क केला. त्यांच्या बरोबर फोन वरून चर्चाही केली. काय चर्चा झाली याची माहिती या पीडित डॉक्टर तरुणीच्या वडीलांनी दिला.
राहुल गांधी यांनी फोन केला होता. त्यांनी माझ्या सोबत पाच ते सहा मिनिटे संवाद साधला असं पीडित तरुणीच्या वडिलांनी सांगितलं. आपण त्यांच्याशी मराठीतच बोललो असं ही त्यांनी सांगितेल. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहीजे. जे आरोपी आहेत त्यांनी फाशी झाली पाहीजे अशी मागणी ही राहुल गांधींकडे केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय याची एसआयटी चौकशी झाली पाहीजे अशी मागणी ही केली. त्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देवू असं आश्वासनही गांधी यांनी यावेळी दिलं. आमच्यावर विश्वास ठेवा असं ही ते बोलले.
आपण त्यांच्याशी मराठीत बोललो पण आपली मुलं त्यांच्याशी हिंदीत बोलले असं ही त्यांनी सांगितलं. दरम्यान या केस मध्ये तपास हा संथ गतिने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी ही व्यक्त केली. शवविच्छेदन अहवालाबाबत आपल्याला काही समजत नाही असं ही ते म्हणाले. आम्हा अडाणी आहोत. त्यामुळे मोठ्या लोकांमधलं काही समजत नाही. फक्त मुलीला ज्यांनी त्रास दिला त्यांना शिक्षा द्या हीच आपली मागणी आहे. पण तसं होताना दिसत नाही असं ही ते म्हणाले.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित डॉक्टर तरुणीच्या घरी अनेक नेते येवून गेले आहेत. पण ते कोण कोण आहेत हेच आपल्याला माहित नाही. त्यांना कधी आपण पाहिलं ही नाही. त्यांना ओळखत ही नाही असं पीडित डॉक्टर तरूणीच्या वडीलांनी सांगितलं. मात्र अनेक लोक येवून भेटून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तपास आता वेगाने झाला पाहिजे असं ते म्हणाले. आरोपींना फाशी हीच एकमेव शिक्षा असल्याचं ते म्हणाले. आपल्याला न्याय मिळाला पाहीजे हिच त्यांची मागणी होती.