
राहुल तपासे
Satara Patharpunj Village EXCLUSIVE: भारताच्या पावसाच्या इतिहासात नोंद झालेला विक्रम, आणि विक्रम कुठे तर आपल्या महाराष्ट्रातील साताऱ्यात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पाथरपुंज गाव. चोहो बाजूला हिरवाईचा समुद्र आणि तेथे ढगांचा मुक्काम. इथे पावसाळा आला की सूर्यकिरणांचाही गावकऱ्यांना विसर पडतो. मात्र यंदाचा पाऊस असा की त्याने या पाथरपुंज गावाला शिखरावर नेऊन बसवले.
पाथरपुंज गावाचा जागतिक रेकॉर्ड
सरासरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा राज्यभरातल्या पावसाला सुरुवात झाली ती जवळपास एप्रिल महिन्यात. असाच पाऊस सुरू झाला तो सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाथरपुंज गावातही. यंदाच्या या पावसाच्या सरी अशा काही कोसळल्या की या पावसाच्या आकडेवारीने रेकॉर्डच ब्रेक केला.. भारतात यंदाच्या वर्षात सर्वाधिक पाऊस झाला तो या पाथरपुंज गावात. तब्बल ७ हजार तीनशे मिलिमीटर पर्यंतचा पाऊस. मग आम्ही विचार केला, या गावात जाऊन या ठिकाणचा ग्राऊंड रिपोर्ट करण्याचा. आमची टीम साताऱ्यातून पाथरपुंज गावाकडे. सातारा शहरापासून सुमारे शंभर किलोमीटरचा हा प्रवास होता. कोयना धरणाच्या अलीकडे असलेल्या धक्कापुलापर्यंत आम्ही आलो. तेथून पुढे आमचा खरा प्रवास सुरू झाला.
निसर्गाचे वरदान!
पुढे काही किलोमीटर सरकल्यावर समजलं दगड-धोंड्यांमुळे कार या गावाकडे जाऊच शकत नाही. आम्ही त्या भागात जाऊ शकणारी पिकअप गाडी भाड्याने घेतली. पिकअपचा प्रवास तसा आमचा नवखा होता, पण पर्याय नव्हता. जसजशी वळणं घेत डोंगरांच्या कडा पार करत पुढे सरकू लागलो, तसतशी गाडी माती-चिखलात फसू लागली. चालकाचं कसबही फेल ठरत होतं. दोन ठिकाणी गाडी चिखलात अडकलीच. एकीकडे भीतीचा डोंगर होता तर दुसरीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे जाताना आम्हाला निसर्ग भुरळ घालायला लागला.
धुके, ढग आणि अंगावर कोसळणाऱ्या तुरळक सरी. या भागात लोकांना वहिवाटीसाठी दोन जीप आहेत, त्या पण मेंढरं भरल्यागत होतात. हिरव्या शालूत नटलेल्या या डोंगराकडे पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत होतं. जी फुले कास पठारावर दिसतात, तीच फुलांची पठारे या ठिकाणीही दिसली. पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचे आवाज कानावर पडू लागले. हळूहळू घनदाट जंगल आम्हाला वेढा द्यायला लागले.
पावसाचे तुफान
या घनदाट जंगलात आम्हाला एक वेगळं वैशिष्ट्य दिसू लागलं, ते म्हणजे तुफान पावसामुळे या भागातल्या झाडांना शेवाळ्याने लपेटलं होतं. व्याघ्रप्रकल्पाचं चेकपोस्ट लागलं. जंगलातील वाटेने जाताना थोडं धडधड वाटत होतं. पण पावसाने रेकॉर्ड ब्रेक केलेल्या पाथरपुंज गावात जायचंच होते. गावाकडे जाणारा हा मार्ग सांगायला कोणीच नव्हते. तसंच पुढे सरकत असताना गावाच्या वेशीवर आम्हाला पाथरपुंजकडे जाणाऱ्या दगडाचा फलक दिसला आणि आम्हाला आनंद झाला. साडेतीन तासांच्या अथक प्रवासानंतर पहिल्यांदा आम्हाला पाथरपुंज गावची शाळा दिसली.
शाळेच्या पटांगणात शाळकरी मुलांनी गाण्याच्या तालावर लेझीमचा डाव आखला होता तल्लीन होऊन नाचत होती. शाळेत पोरं कमी होती, मात्र जी होती ती हुशार होती. शाळेच्या पोरांनी आम्हाला पावसाची माहिती सांगताना शाळेत यायला या पावसामुळं कशा अडचणी आहेत हे सांगायला सुरुवात केली. शिक्षकांनीही गावची माहिती दिली. पुन्हा आमचा प्रवास पुढे सुरू झाला. पुढे आल्यावर गावाच्या तोंडावर लावलेला पाथरपुंज गावचा फलक दिसला. गावात शुकशुकाट होता.
गावकऱ्यांनी वाचला अडचणींचा पाढा!
गावतली पुरुष मंडळी कामानिमित्ताने दिवस उजाडताच तालुक्याच्या ठिकाणी गेली होती. तर काही पुरुष मंडळी शेताकडे गेली होती. भीतीभीतीने बायका बाहेर आल्या, आम्ही त्यांना बोलतं केलं. भारतात सर्वाधिक पाऊस तुमच्या पाथरपुंज गावात झाल्याचं आणि तुमच्या गावाचं नाव भारतभर गाजल्याचं आम्ही सांगितले. आम्हाला वाटलं लोक खुश होतील.. पण कसंल काय? गावकऱ्यांनी या पडणाऱ्या पावसामुळं झालेल्या दुःस्थितीचाच पाढा वाचायला सुरुवात केली.
पाथरपुंज गावात पाऊस काही नवखा नाही. कायमचाच कोसळधारा. पाऊस एकदा का सुरू झाला की गावातून सोडा, घरातूनही बाहेर कोणाच्या घरी जाता येत नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात होते आणि ही ग्रामस्थ मंडळी एप्रिल-मे महिन्यातच घर सावरायला सुरुवात करतात. म्हणजे घर पालापाचोळ्याने झाकायला सुरुवात करतात तर काही लोक प्लॅस्टिक लावून घर बंदिस्त करतात घरात जायचं तर वाकून
यंदाच्या वर्षी लोकांनी सावरा-संभाळ करण्याच्या आधीच पावसानं गावात मुक्काम केला, एप्रिलपासूनच पावसाला सुरुवात झाली. बाहेर पडणं मुश्कील केले. तसंच लोकांनी घराला काठ्या-पालांच्या सहाय्याने झाकले. काहींनी प्लॅस्टिकचं आवरण टाकले पावसाचा जोर वाढत गेला. सणवार समजेना इतका धो-धो पाऊस कोसळायला लागला. या लोकांचा गणपती उत्सव तर घरातच झाला अनेकांना गणरायाची मूर्ती आणताही आली नाही. विसर्जन तर लांबच राहिलं.

जंगलाचा धोका
पावसामुळं सरकारने या लोकांना तीन महिन्यांचं सरकारी धान्य अगोदरच देऊन टाकले. त्यामुळे लोकांनी तीन महिन्याचं राशन घेऊन घरात मुक्काम सुरू केला, आम्ही गावात गेलो त्या दिवशी गावातला पाऊस उघडझाप करत जवळपास थांबला होता. थोड्याफार उन्हांच्या किरणांतून लोक सुखावले होते. पाथरपुंज गावाची जगभर घेतलेली नोंद यांना त्याचं कसलंच सोयरसुतक नव्हतं. त्यांना प्रश्न होता की उद्याचा दिवस कसा काढायचा?
कारण या गावाला वेढा तो सह्याद्री वाघ प्रकल्पाच्या जंगलाचा. जंगलातून कोणताही प्राणी कोणत्याही क्षणी गावात घुसून हल्ला करू शकतो. त्यात यांची शेती म्हणजे भात, नाचणी, या शेतीवर गव्यांचे कळप झुंडीने घुसतात. अंगावर शहारे आणणारे अनुभव ग्रामस्थ आम्हाला सांगत होते. कोणाचा जीव गेला, कोणाला जखमी केलं, तर कोणी बेपत्ता झाले.
पावसाने केले जगणे असह्य
भातशेती जपण्यासाठी शेताच्या मध्यभागी मचान बांधतात, रात्री त्यावर बसून गव्यांना हुसकावतात. गवे शेतात घुसले की पत्र्याचे डबे वाजवायचे, जेणेकरून ते जंगलात परत जातील पण कधी कधी गव्यांचे कळप शेतकऱ्यांच्या त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून शेतात मनसोक्त चरतात आणि पाहता पाहता शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर हाता-तोंडाला आलेलं पीक भुईसपाट होते.
या नुकसानीसाठी वनविभागाकडे दाद मागायला गेलं तर त्यांची उत्तरं न सांगितलेलीच बरी. जीव गेला तर कायद्याप्रमाणे मिळणारी थोडी रक्कम आणि ही नुकसानीची मदत तर इतकी कमी की घरात एक दिवस तरी व्यवस्थित चूल पेटत नाही, ही त्यांची भरपाई. अशा संघर्षातून पुढे सरकणाऱ्या या ग्रामस्थांच्या नशिबात पावसाचं थैमान. आपण कौतुकानं या गावाचं नाव घेतो, पण गावकऱ्यांच्या नशिबी मात्र पावसाने तोंडची भाकरच हिसकावून घेतल्यासारखं आहे.
गावकऱ्यांना या पावसाने यंदा नकोसं केले, अनेकांना चूल पेटवायला सुखी लाकूड नव्हते. जपून ठेवलेला लाकडांचा ढीगही अवेळी आलेल्या पावसानं ओलाचिंब करून टाकला. त्यातच ग्रामस्थांच्या डोक्यावर वनविभागाची कायम टांगती तलवार जंगलातून लाकूड आणतात का? जनावरांची शिकार करतात का, इतकंच नाही तर पुनर्वसनासाठी दबावही.
खडतर प्रवासामुळे शिक्षणही महाग
पुनर्वसनाचा गाजर दाखवत-दाखवत या ग्रामस्थांच्या चार पिढ्या संपल्या.. कितीतरी वेळा शासनाच्या दारात पायताणी झिजवली. कितीतरी वेळा आंदोलन केले, मात्र गेंड्याची कातडी परिधान केलेली यंत्रणा. प्रत्येक येणाऱ्या अधिकाऱ्यानं या लोकांचा समतोल राखत आपली खुर्ची शाबूत ठेवली, आणि या लोकांचं पुनर्वसनाचं घोंगडं तसंच भिजत ठेवले.
कितीतरी पिढ्या पुनर्वसनाच्या आशेवर संपत असताना गावात शिक्षण मात्र जेमतेमच गावात सातवीपर्यंतच शाळा. पुढे शिकायचं तर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागते या खडतर प्रवासामुळे पालकांची मुलांना शिकवण्याची मानसिकता होत नाहीच. त्यात चांगलं शिक्षण द्यायचं तर खिशात दमडी नाही. गरिबीची झळ म्हणून पर्याय एकच शिक्षण थांबवणे.
गाव सोडलं, मुंबई गाठली- तरीही हाल संपेना!
चांगल्या टक्क्यांनी पास झालेली मुलंही या परिस्थितीमुळे थांबली. अनेकांनी गाव सोडले, तालुका गाठला, मुंबई गाठली. तेथे फुटपाथवर झोपून दिवस काढत कसाबसा स्वतःला सावरायला सुरुवात केली. आता बायकापोरांसह गेलेली कुटुंबं मुंबईतच राहतात. मुलांना थोडंफार तरी शिक्षण मिळेल या आशेवर, पण पगार पुरत नाही. गावाकडे वयोवृद्ध आईवडील उपाशी. त्यांनी तसंच जीवन पुढे जगायचे.
या परिस्थितीत मात्र निवडणुकीचं बिगुल वाजला की नेतेमंडळी पायतोडत गावात येतात आश्वासनांची माळ देतात. पण आता ग्रामस्थ मंडळी या नेत्यांवर चिडलेली आहेत. उघडपणे नावं घेऊन शिव्याशाप देतात. त्यांच्या अपेक्षांचा डोंगर इथेच कोसळतो. आता सरकारने आजवर या लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळला असताना, पावसाच्या नोंदीत पहिला नंबर पटकवलेल्या या गावातील घराघरावर गुढ्या उभारून आनंद कसा साजरा करायचा आणि का करायचा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडतो. स्टेजवर भाषण ठोकताना नेते सहज सांगतात मुंबईकडे गेलेली मंडळी आता पुन्हा गावाकडे येतील आणि पर्यटनावर उपजीविका भागवतील. पण प्रश्न हा आहे की, या लोकांनी दररोजच पोट कसं चालवायचं? जगायचं तरी कसं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world