Ratnagiri News :अमेरिकेतील व्हाइट हाऊसप्रमाणे कोकणातही सुरक्षा व्यवस्था कडक; रत्नागिरी पोलिसात 'लिओ'ची एन्ट्री

नव्या दमाचा आणि अफाट ताकदीचा 'लिओ' आता रत्नागिरी पोलिसांच्या ताफ्यात आल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकात आता अधिक चपळता आणि अचूकता येणार आहे. जगभरातील सुरक्षा दलांमध्ये अत्यंत हुशार, धाडसी आणि चपळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'बेल्जियन मालिनॉइस' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जातीच्या श्वानाचा रत्नागिरी पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या श्वानाचे अत्यंत थाटात 'लिओ' असं नामकरण करण्यात आलं.

रत्नागिरी पोलीस दलात पहिल्यांदाच 'बेल्जियन मालिनॉइस'चे आगमन

'बेल्जियन मालिनॉइस' ही श्वानांची जात तिच्या अफाट कार्यक्षमता, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वासाचा माग काढण्याची अद्भुत क्षमता आणि आक्रमकतेसाठी जगभरात ओळखली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात त्या 'व्हाईट हाऊस'च्या सुरक्षेपासून ते अनेक देशांच्या कमांडो पथकांपर्यंत या श्वानांचा वापर केला जातो. रत्नागिरी पोलीस श्वानपथकात या प्रजातीचा श्वान समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'लिओ'च्या या आगमनामुळे रत्नागिरी पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखा आणि कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे.

नक्की वाचा - Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास महागणार; पर्यटकांमध्ये संताप, स्थानिकही झाले आक्रमक

गुन्हेगारांचा माग काढणे आता अधिक सोपे होणार

यापूर्वी जिल्ह्यात घडलेल्या चोरी, घरफोडी, आणि खुनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस श्वानपथकातील श्वानांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. मात्र, बदलत्या काळातील आव्हाने आणि गुन्हेगारांची नवी कार्यपद्धती लक्षात घेता, 'लिओ'सारख्या हाय-टेक आणि चपळ श्वानाची अत्यंत गरज होती. आगामी काळात घातपात विरोधी कारवाया, व्हीआयपी सुरक्षा, अमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि कठीण मोहिमांमध्ये 'लिओ' पोलिसांचा मुख्य कणा ठरणार आहे.

Advertisement

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा

पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी, श्वान पथकाचे मार्गदर्शक, हँडलर्स आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने दाखल झालेल्या या 'लिओ'ला आता विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर तो प्रत्यक्ष पोलीस मोहिमांमध्ये सक्रिय होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नव्या दमाचा आणि अफाट ताकदीचा 'लिओ' आता रत्नागिरी पोलिसांच्या ताफ्यात आल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे.