सागर जोशी, प्रतिनिधी
Shahu Maharaj Chhatrapati Sparks Row: राज्यात टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नंतर आता कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात नवी ठिणगी पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजप आणि शिवसेना यावरून आक्रमक झाले आहेत.
शाहू महाराज छत्रपती काय म्हणाले?
शिवजयंतीच्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी टिपू सुलतानबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपले काम करायचे ठरवले असावे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतानशी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Akola News :'टिपू सुलतान'वरून अकोला महापालिकेत तणाव; पाहा, राजकीय वादात AIMIM नं नक्की काय केलं? )
भाजपाचा शाहू महाराजांना सल्ला
शाहू महाराजांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीने तातडीने आक्षेप घेतला आहे. भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शाहू महाराजांना आवाहन करताना म्हटले आहे की, कृपया इतिहास तपासून पाहावा. ज्याने मंदिरे लुटली आणि हिंदूवर अत्याचार केले, तो व्यक्ती शिवरायांचा आदर्श कसा घेऊ शकतो? शिवराय आणि टिपू सुलतान यांची तुलना करू नका, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. भाजपाकडून या विधानाचा तीव्र निषेध करण्यात येत असून यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.
वादाची सुरुवात कधी झाली?
या संपूर्ण वादाची ठिणगी मालेगावमध्ये पडली होती. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता, तिथून हा वाद सुरू झाला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही टिपू सुलतानबाबत सकारात्मक विधान केले होते. सपकाळ यांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने राज्यभरात शिवसेना आणि भाजपच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती.
( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )
हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादावर खेद व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, आता शाहू महाराज छत्रपती यांनी तशाच प्रकारचे विधान केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यावर काय भूमिका घेते आणि आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण किती तापते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world