Sunetra Pawar Oath Sharad Pawar Absent : राज्याच्या राजकारणात शनिवारी एक मोठी ऐतिहासिक घडामोडी घडली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली असून, यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे. मात्र या महत्त्वाच्या सोहळ्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या अनुपस्थितीवर आता स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी काय सांगितलं?
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता, खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, मला या शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीही कल्पना किंवा माहिती नाही. सुप्रिया सुळे यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले आणि कौटुंबिक किंवा राजकीय प्रश्नांना बगल दिली.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार गहिवरल्या, उपमुख्यमंत्री झाल्यावर दिली भावुक प्रतिक्रिया )
दिल्ली दौऱ्याचे कारण
शपथविधीला उपस्थित न राहण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी आपल्या नियोजित कामाचा दाखला दिला. उद्यापासून संसदेचे बजेट अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे मला दिल्लीला जाणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. माझी फ्लाईट असून मी दिल्लीसाठी रवाना होत आहे, कारण मी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाची नेत्या आहे आणि माझी तिथे उपस्थिती महत्त्वाची आहे, असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले.
शरद पवार यांना माहितीच नव्हती
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या संपूर्ण घडामोडीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. बारामतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, मला या शपथविधीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. केवळ बातम्यांमधूनच मला हे समजले की आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या इच्छेचा केला उल्लेख
शरद पवार यांनी यावेळी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याची अजित पवार यांची तीव्र इच्छा होती आणि ते याबाबत खूप आशावादी होते. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यासाठी अजित पवार यांनी 12 फेब्रुवारी ही तारीख देखील निश्चित केली होती, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे अचानक घडलेल्या या शपथविधीने राजकीय समीकरणे पुन्हा बदलल्याचे दिसून येत आहे.
( नक्की वाचा : NCP Merger : अजित पवारांच्या प्रस्तावाला स्वपक्षातूनच विरोध, 2-3 नेते...जयंत पाटलांचा मोठा धमाका! पाहा VIDEO )
हा पक्षांतर्गत निर्णय असल्याची शक्यता
शपथविधी सोहळ्याला पवार कुटुंबातील कोणी जाणार का, या प्रश्नावर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, हा कदाचित त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे या प्रक्रियेत समोर आली असून त्यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. पक्षांतर्गत चर्चा करूनच त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असावे, मात्र या प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेण्यात आले नव्हते, असे पवार यांनी स्पष्ट केले.