प्रांजल कुलकर्णी, कर्जत- जामखेड: राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज संपणार आहे. सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना रोहित पवार यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याबाबत सूचक विधान केले.
काय म्हणाले शरद पवार?
'या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान ठिकठिकाणी जाऊन लोकांना आव्हान करत होते. मला 400 जागा द्या. देशाचे मंत्रीमंडळ चालवण्यासाठी 300 पेक्षा कमी जागा असल्या तरी चालतात.मग 400 पार कशासाठी? आम्हाला शंका आली आणि लक्षात आलं यांना संविधान बदलायचे आहे.त्यानंतर आम्ही घटनेत बदल करण्याचा अधिकार मोदींना घेऊ द्यायचा नाही.. असा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी तुमचेही आभार मानायचे आहेत. या महाराष्ट्रात जवळपास 31 खासदार निवडून दिले. हे सर्व लोकप्रतिनिधी घटनेच्या रक्षणासाठी संसदेत उभे राहिले. पण मोदी गप्प बसणारे नाहीत,' अशी टीका शरद पवार यांनी केली.
नक्की वाचा: सकाळी काँग्रेसचा प्रचार अन् सायंकाळी शिंदे गटात प्रवेश, गीता यादव यांची जोरदार चर्चा
'त्यांनी आता विधानसभेवर लक्ष दिले आहे. आज बेरोजगार तरुणांची संख्या 62 लाख आहे. अशावेळी त्याच्या डोक्यात दुसरा विचार येणारच. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. युती सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार वाढले..67380 महिलांच्या तक्रारी दाखल आहेत. महाराष्ट्रात 62 लाख तरुण बेरोजगार आहेत. शेती हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. महायुती सरकारच्या काळात 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही.,' अशी टीकाही त्यांनी केली.
रोहित पवारांचे कौतुक
'कर्जत जामखेडमध्ये रोहितला तुम्ही घरचा प्रतिनिधी मानला. त्यानेही या जिल्ह्यामध्ये काम केले. या तालुक्याला एक 10 वर्ष आमदार होता. मंत्री होता. काय दिवे लावले. विकास केला तो तुमचा नाही, विकास स्वतःचा केला. उद्या आम्ही म्हणतोय सत्ता आमच्या हातात नाही. दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवल्या आहेत. त्या आम्ही मार्गी लावू. एमआयडीसी काढायचे ठरवले पण आमचे सरकार पडले. आज या राज्यात लेकरांची बेकारी घालवायची असेल तर त्याच्या हाताला काम दिले पाहिजे. इथेही पुढच्या पाऊलासाठी रोहितचे कष्ट आहेच पण तुम्हीही सोबत घेतले पाहिजे. आमची सगळी सत्ता त्याच्या पाठिशी लावू. रोहितच्या मागे शक्ती उभी करा. तुम्हाला कर्जत जामखेडचे परिवर्तन करु,' असा शब्द शरद पवार यांनी दिला.
मोठे विधान..
'त्याचे वय लहान आहे. त्याची आमदारकीची पहिली टर्म आहे.1967 साली मी आमदार झालो तेव्हा माझं वय २७ वर्ष होते. पहिले मी ५ वर्ष आमदार होतो. मला काही पद नव्हते. रोहितलाही पद नव्हते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री, तिसऱ्या वर्षी मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री.अशी सगळी पदे
माझ्या गळ्यात पडली. ह्यांचं पहिलं वर्ष संपलं. दुसर वर्ष तुमच्या हातात आहे. तुम्ही योग्य हाताळलं तर काय करायचं ते माझ्या हातात आहे. त्यासाठी योग्य निर्णय घ्या. हे यश महाराष्ट्राला शक्ती देणारे नव्या पिढीला पुढे आणणारे ठरेल..' असं शरद पवार म्हणाले.