प्रतिनिधी, सुजित आंबेकर
शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाची सुरुवात तुतारी फुंकून केली जात होती. मात्र सद्यपरिस्थितीत या लढाईतील शस्त्रांची जागा निवडणूक आणि मतांनी घेतली आहे. शरद पवार यांच्या नव्या पक्षाला तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह मिळाल्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या तुतारी वादकांना महत्त्व प्राप्त झालंय. एखाद्या लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमात चार तुतारी वादकांना मिळून हजार रुपये दिले जात होते, मात्र गेल्या काही दिवसात हेच चित्र पूर्णपणे पालटल्याचं दिसून येतंय. NDTV मराठीच्या प्रतिनिधीने साताऱ्यातील काही तुतारी वादकांशी संवाद साधला आणि त्यांच्या आयुष्यात नेमका काय आणि कसा बदल झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शरद पवारांनी किल्ले रायगडावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करुन तुतारी फुंकणारी व्यक्ती या चिन्हाचं अनावरण केलं. रायगडावरच याचं अनावरण करण्यामागे ऐतिहासिक कारण आहे. महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य असलेल्या तुतारीचा इतिहास शिवाजी महाराजांशी जोडला गेलेला आहे. लढवय्यांच्या मनगटात प्रेरणा देणारे हे वाद्य युद्धाच्या सुरुवातील फुंकण्याची प्रथा होती. निवडणुकीचा संदर्भ देत शरद पवारांनी रायगडावर तुतारी फुंकणारी व्यक्ती या चिन्हाचं अनावरण करीत नव्या संघर्षाला तोंड फोडलं. जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाला हे चिन्ह मिळालं, तेव्हापासून तुतारी वादकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला आहे. साताऱ्यातील तुतारी वादकांशी आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी संवाद साधला.
साताऱ्यातील पाटकळ गावातील अनिकेत गुरव हा तरुण तुतारी वादक नव्या बदलाविषयी सांगतो, तुतारी या वाद्याला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. गुरव समाजात तुतारी वादनाची परंपरा आहे. शरद पवारांनी आपल्या पक्षाला तुतारी चिन्ह दिल्यामुळे गुरव समाजाचा मान वाढला आहे. इतकच नाही पूर्वी एखाद्या कार्यक्रमात चार ते पाच तुतारी वादकांना बोलावलं जात होतं, मात्र आता ही संख्या वाढली आहे आणि मानधनातही वाढ झाली आहे.
हे ही वाचा- अजितदादांच्या 'पवार कार्ड'वर शरद पवारांची नवी खेळी! म्हणाले....
तुतारी वादकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस
खरं तर तुतारी फुंकताना वादकांच्या शारीरिक क्षमतेचा कसं लागतो. तुतारी किती वेळ फुंकता येऊ शकते, हे त्यांची श्वसन क्रिया किती व्यवस्थित आहे, यावर अवलंबून आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून तुतारी फुंकून लढाईची सुरुवात किंवा राजाच्या स्वागतासाठी वापर केला जात होता. मात्र गेल्या महिन्यापासून तुतारी हे चिन्ह शरद पवारांच्या नव्या पक्षाला मिळालं आणि तुतारी वादकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आलेत. पूर्वी तुतारी वादकांना एका कार्यक्रमासाठी फारसे पैसे दिले जात नव्हते. याशिवाय फार तुतारी वादकांना बोलावलंही जात नव्हतं. साधारण 4 जणांना 1000 रुपये मिळत होते. मात्र आता निवडणुकीमुळे 50 ते 100 जणांना तुतारी फुंकण्यासाठी सुपारी मिळत आहे. त्यातही साधारण प्रत्येक वादकाला किमान 500 ते 700 रुपये दिले जात आहेत. निवडणुकीत तुतारी चिन्ह मिळाल्याने या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.