Ajit Pawar vs Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बारामतीमध्ये यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी बारामतीवर फोकस केलाय. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी 'पवार कार्ड' चा वापर करत बारामतीकरांना आवाहन केलं होतं. अजित पवारांनी टाकलेला हा चेंडू आज (गुरुवार, 11 एप्रिल) शरद पवारांनी त्यांच्या शैलीत टोलावला आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
'बारामतीची जनता नेहमी पवार आडनावाच्या मागे उभी राहते. 1991 साली तुम्ही मुलगा म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. त्यानंतर वडिलांना म्हणजेच साहेबांना निवडले. त्यानंतर तीन वेळा लेकीला निवडून दिले. आता सुनेला निवडून दिले की फिट्टामफाट होईल.' असं सांगत अजित पवारांनी बारामतीमध्ये 'पवार कार्ड' वापरले होते. अजित पवारांच्या या डावपेचाला शरद पवारांनी उत्तर दिलं.
शरद पवारांनी दिलं उत्तर
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीचं जागावाटप, माढामधील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांचा राज्यात सुरु असलेला प्रचार यासह वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं. त्यावेळी 'पवारांच्या पाठिशी उभं राहा' या अजित पवारांनी केलेल्या आवाहनाला त्यांनी उत्तर दिलं.
'अजित पवार यांच्या बोलण्यात काय चूक आहे? बारामतीची जनता नेहमी पवारांच्याच मागं उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार... असं पवारांनी सांगताच पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ उडाला. सुप्रिया सुळे या मूळ पवार आहेत. तर सुनेत्रा पवार या लग्नानंतर पवार झाल्याचं सांगत त्या बाहेरच्या आहेत, हेच अप्रत्यक्षपणे पवार यांनी यामधून सुचवलं असल्याचं मानलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world