Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबांच्या मूळ चरण पादुका भारतभ्रमण दौरा आता उच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईसंस्थानच्या पादुका दर्शन सोहळ्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. येत्या 7 एप्रिलपर्यंत साई संस्थानने लेखी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश साई संस्थानला दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साई संस्थानने येत्या 10 एप्रिलपासून साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याच आयोजन केलं आहे. बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ पादुका आता भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. देशाभरात हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात साईंच्या चरण पादुका दक्षिण भारतातील 8 शहरात 15 दिवसात 2 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
नक्की वाचा - Malegaon News : गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलन, साध्वी प्रज्ञांना हिंदूवीर' पुरस्कार; उच्च न्यायालयाने काय सांगितलं?
साई बाबांच्या पादुका सव्वाशे वर्ष जुन्या असून चर्म पादुका आहेत. त्यामुळे याचं पावित्र्य आणि सुरक्षाचा मुद्दा उपस्थित करत संजय काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर आता 7 एप्रिलपर्यंत संस्थानला त्यांचं लेखी म्हणणं देत शपथपत्र सादर करावयाचे आहेत. तसेच यावर 7 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचही संजय काळे यांनी स्पष्ट केलं आहे.
या आधीही साई बाबांच्या पादुका अमेरिकेत जाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच जेव्हा जेव्हा साई पादुका देशाबाहेर गेल्या तेव्हा तेव्हा काही तरी वाद उफाळून आल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे यंदा साई संस्थान काय खबरदारी घेणार आणि उच्च न्यायालयातून सामाजिक कार्यकर्त्यांच्या शंकांच कसं निरसन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..