
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावरून कोल्हापूरातले वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापुरातील शिवप्रेमी आणि सिनेट सदस्य यांचा नामविस्ताराला विरोध आहे. तर हिंदूत्ववादी संघटनांनी नामविस्तार झालाच पाहीजे ही मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चाचे ही आयोजन केले आहे. यात आता मुंबई आणि पुण्यातून येवून नामविस्ताराच्या गोष्टी कुणी करत असेल तर त्यांना ठोकून काढू असा इशारा शिवप्रेंमींनी दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरत्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. विद्यापीठाच्या नामांतराच्या दिशेनं हालचाली होत आहेत. असं असलं तरी त्याला विरोधही तितक्या जोराने होत असल्याचं दिसून येत आहे. आता या नामकरणावरून सध्या दोन गट तयार झालेत. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदूत्वावादी संघटना या आक्रमक आहेत. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव घेताना शिवाजी हा शब्द लाखो जणांच्या तोंडी रुळला. पण आता याच विद्यापीठाचं नाव बदलण्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
हिंदुत्ववादी संघटनानी नामविस्ताराचा हट्ट धरला आहे. शिवाजी विद्यापीठाचं छत्रपती शिवाजी विद्यापीठ नामकरण व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे. या नामविस्ताराला हिंदू जनजागृती समितीसह आणखी काही संघटनांची पाठिंबा दिला आहे. विद्यापीठ नामकरणासाठी 17 मार्च रोजी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चाचे आयोजनही केले आहे. या मोर्चापूर्वी विद्यापीठाच्या नामकरणचा स्थगन प्रस्ताव ही आणण्यात आला. नावाचा विस्तार करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली होती.बैठका घेतल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांच्या मते विद्यापीठाचे सध्याचे नाव हे शिवरायांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे ते बदलले जावे असं त्याचं मत आहे.
कोल्हापुरातील शिवप्रेमी संघटना आणि विद्यापीठ सिनेट मेंबर यांचा या नामविस्ताराला विरोध आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव मोठं केलं तर त्याचा इंग्रजीत शॉटफॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका आहे असं शिवप्रेमींचे म्हणणे आहे. शिवाय हे शिवाजी विद्यापीठ हे नाव ठेवताना विचार पूर्वक ठेवलं गेल्याचं ही त्यांचं म्हणणं आहे. शिवाय शिवाजी इतिहासातील प्रचलीत शब्द होता. मुघलांवर हल्ला झाली की शिवाजीने हल्ला केला असा उल्लेख इतिहासात आहे, असं इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजा विद्यापीठ नावाचे विद्यापीठ अस्तित्वात आहे. त्यात तशाच नावाचे दुसरे विद्यापीठ का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान कोल्हापूरातल्या शीवप्रेमींनीही नामविस्तारा विरोधात बैठक घेतली. त्यात नामविस्ताराला विरोध दर्शवण्यात आला. शिवाय परस्पर जर कुणी निर्णय घेत असेल तर त्यांना कोल्हापुरी पाणी दाखवू. ठोकून काढू असा इशारा देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी ही सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घ्यावे असा निर्णय ही घेण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न आणखी तापण्याची दाट शक्यता आहे. आता दोन्ही संघटना आक्रमक झाल्यामुळे 18 नोव्हेंबर 1962 ला स्थापना झालेल्या या विद्यापीठाचा हा मुद्दा नेमका कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world