Congress leader and former Union Minister Shivraj Patil passes away : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. लातूरमधील चाकूर या छोट्या गावातून सार्वजनिक आयुष्याला सुरुवात करणारे शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वत:चा ठसा उमटवला होता.अगदी विरोधी पक्षांमध्येही त्यांच्या कार्याची दखल घेणारे, त्याचं क्रेडिट त्यांना देणारे नेते होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवराज पाटील चाकूरकर यांचा पक्ष कायम वेगळा होता. पण, दोघांनाही एकमेकांच्या कार्याचा कायम आदर होता. अटलबिहारी वाजपेयींनी तर थेट लातूरमधील एका निवडणूक प्रचार सभेत शिवराज पाटील चाकूरकर यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यावेळी अटीतटीची असलेली ही निवडणूक शिवराज पाटलांच्या बाजूनं झुकली आणि त्यांचा विजय झाला. शिवराज पाटील यांच्या निधनानंतर तो किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शिवराज पाटील यांची कारकिर्द
अटलबिहारी वाजपेयी शिवराज पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण, त्यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकिर्द पाहूया.
मराठवाड्यातील लातूर हे शिवराज पाटील यांचं कार्यक्षेत्र. 1972 ते 1980 या काळात ते लातूरचे आमदार होते. त्या कालावधीमध्येही त्यांनी काही काळ विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम केलं.
( नक्की वाचा : Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video )
1980 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले. 1980 ते 2004 या कालावधीमध्ये ते लोकसभा खासदार होते. या कालावधीमध्ये झालेल्या 7 लोकसभा निवडणुकीत ते सलग विजयी झाले.
इंदिरा गांधी तसंच राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली. 2004 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांचा थेट केंद्रीय गृहमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय नेते असल्यानं त्यांना ही मोठी संधी मिळाली. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना मंत्रिपद गमावावं लागलं. बॉम्बस्फोटाच्या गंभीर घटनेनंतर दर काही तासांनी कपडे बदलण्याची त्यांची सवय चांगलीच वादग्रस्त ठरली होती. संसदीय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंजाबचं राज्यपालपदही भूषवलं.
( नक्की वाचा : अटल बिहारी वाजपेयींच्या 3 वाक्यांनंतर समजला देशाचा कौल )
काय म्हणाले होते वाजपेयी?
1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील हा प्रसंग आहे. त्यावेळी लातूरमधून भाजपानं डॉ. गोपाळराव पाटील हे उमेदवार होते. देशभर भाजपाला अनुकूल वातावरण होतं. लातूरमध्येही गोपाळराव फॉर्मात होते. या लढतील गोपाळराव बाजी मारणार, लातूरमध्ये परिवर्तन होणार, असं मानलं जात होतं.
गोपाळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपाचे सर्वात ज्येष्ठ नेते, स्टार प्रचारक असलेले अटलबिहारी वाजपेयी लातूरमध्ये आले होते. त्यांनी त्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. पण, शिवराज पाटलांवर टीका करणं टाळलं.
इतकंच नाही तर शिवराज पाटील चांगले व्यक्ती आहेत. पण, त्यांचं पक्ष चुकीचा आहे, असं वक्तव्य वाजपेयी यांनी केलं. त्यांनी लोकसभा चांगली चालवली याचाही उल्लेख केला. वाजपेयी यांच्या वक्तव्यामुळे अचानक लातूरमधील हवा फिरली.
भाजपाच्या दिशेनं झुकत असलेला लातूरमधील मतदारांचा कौल पुन्हा काँग्रेसच्या पारड्यात गेला. शिवराज पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. एका अर्थाने शिवराज पाटील यांच्या विजयात अटलबिहार वाजपेयी यांचं एक वाक्य निर्णायक ठरलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world