Devendra Fadnavis Exclusive : लातूर आणि मराठवाड्याच्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. शक्तिपीठ महामार्ग तसंच राज्यात सुरु असलेल्या अन्य रस्ते कामांमुळे लातूरहून मुंबईला जाण्याचा प्रवासाचा वेळ आता 11 तासांवरून थेट 4.5 ते 5 तासांवर येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी'च्या 'अनस्टॉपेबल महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मोठी माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
सध्या रस्ते मार्गाने लातूर ते मुंबईचा प्रवास करण्यासाठी साधारणपणे 11 तासांचा वेळ लागतो. हा वेळ वाचवून मराठवाड्याला थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी देण्याच्या उद्देशाने 'शक्तीपीठ महामार्ग' महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लातूरहून मुंबईला पोहचण्यासाठी केवळ 4.5 ते 5 तास लागतील. तेवढ्या वेळात लातूरचा माणूस मुंबईत पोहचू शकेल, या पद्धतीनं आम्ही मार्गाचं आरेखन केलं आहे."
( नक्की वाचा : Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे सतत दिल्लीला का जातात? CM नी सांगितलं कारण, 2029 बाबत मोठी घोषणा )
या महामार्गाच्या आरेखनाचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. धाराशिवपर्यंतचे जुने आरेखन कायम ठेवण्यात आले असले तरी, धाराशिवनंतर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे. या बदलामुळे चंदगडसारख्या 'अनटॅप' राहिलेल्या प्रदेशालाही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
या मार्गामुळे मराठवाडा, सोलापूर जिल्हा आणि सांगलीच्या दुष्काळी भागाचं भविष्य पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तिपीठ महामार्गही विकासाची गंगा घेऊन येईल आणि मराठवाड्याचे चित्र बदलेल, अशी त्यांची खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी या वर्षातच सर्व प्रशासकीय निर्णय पूर्ण करून या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Pune Land Scam : FIR मध्ये नाव नाही म्हणजे... मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन! )
आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर त्यामध्ये लक्षात येईल की नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला आहे.शक्तिपीठ खालून गेलाय. आता आणखी कनेक्टिव्हिटी पाहिजे. ज्या माध्यमातून आपल्याला पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सर्व जोडता येईल त्या दृष्टीनं आम्ही मार्ग तयार करतोय. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लातूरहून मुंबईला पोहचण्यासाठी साडेचार ते पाच तास लागतील. तेवढ्या वेळात लातूरचा माणूस हा मुंबईत पोहचू शकेल,
या पद्धतीनं आम्ही मार्गाचं आरेखन केलं आहे. या वर्षातच त्याचे सर्व निर्णय पूर्ण करुन त्याची काम सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world