Uddhav Thackeray Dasara Melava Speech : विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात जोरात वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही. पण, सर्व राजकीय पक्ष केव्हाच 'इलेक्शन मोड'मध्ये पोहोचले आहेत. महायुती सरकारनं निर्णयांचा पाऊस पाडलाय. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त घटकांना खुश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
विरोधातील महाविकास आघाडीतही जागा वाटपांची खलबतं सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं यश मिळाल्यानं आघाडीचे नेते सध्या फॉर्मात आहेत. राज्यात सत्तांतर होणार हा त्यांना विश्वास आहे. तो विश्वास मतदारांवर ठसवण्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांचा निवडणूक अजेंडा सांगण्याची मोठी संधी चालून आली आहे. दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच 'दसरा मेळावा' हा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी वर्षातील महत्त्वाचा इव्हेंट असतो. यंदा तर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मेळावा होत असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना आणि दसरा मेळावा
एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान ही पंरपरा जपणारी संघटना अशी शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 साली रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला. त्यानंतर ती शिवसेनेची परंपरा बनली. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही परंपरा पुढं चालवत आहेत.
शिवसेनेमध्ये 2022 साली फुट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट पक्षातून बाहेर बनला. सध्या याच गटाकडं शिवसेनेचं नाव आणि अधिकृत चिन्ह आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचे स्वतंत्र दसरा मेळावा होतो. पण, शिवसेना कार्यकर्त्यांशी भावनिक कनेक्ट असलेलं शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरे गटाकडंच आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. ठाकरे या मेळाव्यात कोणते मुद्दे मांडू शकतात ते पाहूया
( नक्की वाचा : क्रिकेट ते राजकारण... ऐतिहासिक घटनांचं आहे मुंबईतील 'हे' मैदान साक्षीदार )
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल
उत्तर भारतामधील दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आहेत. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपानं सत्ता मिळवली. तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार सत्तेत आलं आहे. हरियाणामधील विजयानं भाजपा सध्या फॉर्मात आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात निवडणूक निकालांवर भाष्य करु शकतात.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावर ठाकरे यांनी यापूर्वीही टीका केली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणात ते हा मुद्दा पुन्हा मांडू शकतील. भाजपाचा विजय हा EVM आणि निवडणूक आयोगाचा विजय असल्याचं भासवत पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं आणि मतदारांना आपल्याकडं खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेलं मशाल हे चिन्ह लोकसभा निवडणुकीत नवं होतं. त्यांचा पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक 'मशाल' चिन्हावर लढवणार आहे. या चिन्हाचा घरोघरी प्रचार करा, असं आवाहन ठाकरे दसरा मेळाव्यात करतील.
( नक्की वाचा : हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र )
मुंबई आणि राज्यातील घटना
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात घडलेल्या घटनांवर उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका दसरा मेळाव्यात मांडतील. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार, अक्षय शिंदे एन्काऊन्टर, पुण्याजवळील बोपदेवमधील बलात्कार प्रकरण, पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण, मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची दुर्घटना, लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारकडून होणारा आक्रमक प्रचार या मुद्याचा ठाकरे या मेळाव्यात समाचार घेतील.
शिवसेनेसाठी मुंबई महानगर अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ठाकरे यांच्या भाषणात मुंबईतील काही मुद्यांचा समावेश असेल. मुंबईतील मेट्रो-3 चा पहिला टप्पा नुकताच सुरु झाला आहे. या मेट्रोसाठी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये कारशेड करण्यास ठाकरे यांच्या पक्षानं मोठा विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे मेट्रो-3 वर काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता आहे.
( नक्की वाचा : 'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप )
आरक्षणाचा प्रश्न
राज्यातील महायुती सरकारसमोर आरक्षाणाच्या प्रश्नांचं मोठं आव्हान आहे. मनोज जरांगे-पाटील मराठ्यांना सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून आंदोलन करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. तर धनगर समाजही एसटी प्रवर्गवातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुपूर्वी पक्षाची भूमिका स्पष्ट करु शकतात. ते आरक्षणाबाबत काय आश्वासन देणार? निवडणुकांपूर्वी काही मोठी घोषणा करणार का? याकडंही राज्याचं लक्ष आहे.
( नक्की वाचा : 'आम्ही मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण नंतर...' देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सर्व इतिहास )
मोदी, अमित शाह आणि फडणवीस
उद्धव ठाकरेंची गेल्या काही वर्षातील भाषणं ही सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांमा लक्ष्य करणारी असतात. मातोश्रीमधील बंद दरवाज्याच्या आड झालेल्या चर्चेत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शाह यांनी पाळलं नाही, असा आरोप करत त्यांनी 2019 साली भाजपाची साथ सोडली.
उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर मोदी-शाह प्रमाणेच देवेंद्र फडणवीस देखील त्यांचं मुख्य टार्गेट असेल. महाराष्ट्राच्या अस्मितेचं संरक्षण आपलाच पक्ष करु शकतो. मोदी-शाह हे गुजराती नेते आणि त्यांचे राज्यातील प्रतिनिधी असलेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं कसं नुकसान करत आहेत, या शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारासाठी दसरा मेळावा ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी संधी आहे. 'विचारांचं सोनं' लुटण्याचा दावा करत होणाऱ्या या मेळाव्यात ठाकरे या 'संधीचं सोनं' करण्याचा प्रयत्न करतील.
मोदी-शाह-फडणवीस यांना लक्ष्य करणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत हा प्रचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत मराठी मतांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर आपलं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं नाही हे सांगत आपणचं असली हिंदुत्ववादी असल्याचं दाखवत ठाकरे दसरा मेळ्यात भाषण करतील.
( नक्की वाचा : 'तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना उत्तर )
एकनाथ शिंदे लक्ष्य
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्याचबरोबर त्यांना शिवसेना नाव आणि चिन्ह देखील गमावावं लागलं. त्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे या भाषणात मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनाही ते लक्ष्य करु शकतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा केला होता. शिवसेनेच्या पारंपारिक मतांना आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करु शकतात.
( नक्की वाचा : 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट', उद्धव ठाकरेंच्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं चोख उत्तर )
काँग्रेस-राष्ट्रवादीला काय संदेश?
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील या मु्द्याची सर्वांना उत्सुकता आहे. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी उद्धव ठाकरे यांची आग्रही मागणी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ही मागणी मान्य केलेली नाही. त्याचबरोबर जागावाटपाचा पेच अजुन पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातील भाषणात या विषयावर काय बोलणार? विरोधकांवर टीका करत असताना मित्रपक्षांना काय संदेश देतात.
टोले आणि टोमणेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मित्रपक्षांसाठी काही 'बिटविन द लाईन्स' अर्थ निघणार का? याची उत्तर दसरा मेळाव्यात मिळणार आहेत.