निनाद करमरकर
अंबरनाथमध्ये शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला पत्ता उघडला आहे. वाळेकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं असून भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले बॅनर्सही लावले आहेत.
नक्की वााचा: 'मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं'; दसरा मेळाव्याला भगवान गडावरून पंकजा मुंडेंचं तडफदार भाषण
अंबरनाथच्या शिवसेनेत शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे. तसंच उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू, असाही प्रस्ताव वरिष्ठांसमोर वाळेकर गटाने ठेवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बालाजी किणीकर हे तीन टर्मचे आमदार असल्यामुळे त्यांना बदललं जाईल का? याबाबत साशंकता होती.
नक्की वाचा: 'खुन्नास देताय, अपमान करताय, आता उखडून फेकणार, सुट्टी नाही' जरांगेच्या भाषणातले 5 ठळक मुद्दे
विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात वाळेकर गटाकडून कुणाला उभं केलं जाणार, हे देखील गुलदस्त्यात होतं. अखेर शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अॅड. संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नव्हे, तर भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले भराडे यांचे बॅनर्सही लावले आहेत. तर शहरप्रमुख वाळेकर यांनी देखील संदीप भराडे यांच्या नावाचा उल्लेख असलेले बॅनर्स रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लावले आहेत. त्यामुळे वाळेकर गट यंदा आमदार किणीकर यांच्या विरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
नक्की वाचा : 'शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा' सर्वांच्या मेळाव्या आधी 'राज' गर्जना
या सगळ्याबाबत ॲड. संदीप भराडे यांना विचारलं असता, 2019 सालच्या निवडणुकीपूर्वीही मी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेस त्यांनी पुढच्या निवडणुकीत बघू असं सांगितलं होतं. त्यानुसार यंदा मी त्यांची भेट घेतली असता त्यांनी 'जो उमेदवार सीट निवडून आणेल, त्याचा विचार होईल, त्यामुळे कामाला लागा!', असे आदेश खासदार शिंदे यांनी दिल्याचा दावा संदीप भराडे यांनी केला आहे.
नक्की वाचा : "उभा राहू का?"; सयाजी शिंदेंच्या प्रश्नावर अजित पवारांचं थेट उत्तर
मागील 15 वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेत एकच चेहरा दिला जात असून आपला मतदारसंघ राखीव आहे. मात्र या मतदारसंघात हवी तशी कामं झालेली नसल्याचं सांगत भराडे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसंच पक्षाने जर तिकीट दिलं नाही, तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढची वाटचाल ठरवू, पण निवडणूक लढवायचीच आहे, असा ठाम निर्धार संदीप भराडे यांनी केला आहे.
वरिष्ठ निर्णय घेतील
या सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विरोधात काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार होतात? की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, याबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना विचारलं असता, मला यावर काहीही बोलायचं नसून वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.