Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Omraje Nimbalkar news: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याची चर्चा असतानाच, आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून त्यांच्या घरातच उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय हा ऐनवेळी घेतलेला नसून, तो गेल्या एक महिन्यापासूनच निश्चित झाला होता, असा धक्कादायक खुलासा त्यांचे सख्खे बंधू तथा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी केला आहे. 'एनडीटीव्ही मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मकरंद राजे यांनी या संपूर्ण पडद्यामागील घडामोडींवरून पडदा उठवला आहे.

"ठाकरेंना सोडण्याचा निर्णय मला पटला नाही"

मकरंद राजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, पक्ष बदलण्याच्या आणि सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत ओमराजे निंबाळकर यांनी आधीच घरात चर्चा केली होती. "ओमराजेंनी या निर्णयाबद्दल महिनाभरापूर्वीच मला सांगितले होते. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडत्या काळात आणि संघर्षाच्या वेळी आमची जी साथ दिली, ती विसरून त्यांची साथ सोडणे मला अजिबात पटले नाही. मी त्यांच्या या निर्णयाला घरामधूनच तीव्र विरोध केला होता", असं मकरंद राजे निंबाळकर यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा-  Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?)

मकरंद राजे ठाकरे गटातच राहणार

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जरी विकासाचे कारण देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश केला असला, तरी त्यांचे भाऊ मकरंद राजे मात्र कोणत्याही परिस्थितीत निष्ठा बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि 'शिवसेना ठाकरे गटातच' कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

या राजकीय भूकंपाचे पडसाद आता धाराशिवच्या स्थानिक राजकारणात उमटू लागले आहेत. ओमराजेंनी मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पराभव आणि वडील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील न्यायालयीन लढाईचे कारण पुढे करत सत्ताधारी गटात जाणे पसंत केले. मात्र भावानेच त्यांच्या या निर्णयाची पोलखोल केल्याने राजकीय वर्तुळात निंबाळकर बंधूंच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article