Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवसापासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. पहिल्याच आठवड्यात हिंदीच्या सत्तेवरून सरकारला एक पाऊल मागे सरकावे लागले. पण असे असतानाच दुसरीकडे सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील एकामागे एक नेते अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले.
Sanjay Shirsat: 'ते घरं माझं, बॅग माझी आणि पैसे....' Viral Video वर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण
एवढेच काय तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागल्याचे दिसत आहे. संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे शिंदेंचे शिल्लेदार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीचा दौरा केला. त्यामुळे त्यांचा हा दौरा देखील चर्चाच विषय ठरत आहे. पण या सर्व आरोपांमुळे शिंदेंचा शिवसेना पक्ष अडचणीत आला आहे.
मारहाण प्रकरणावरुन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा
शिंदे गटाचे सतत चर्चेत असणारे वादाच्या भोवऱ्यात अडकणारे आमदार म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad). दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. निकृष्ठ दर्जाचे जेवण दिल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी ही मारहाण केली, ज्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याप्रकरणी आता गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे.
संजय शिरसाट यांच्या व्हिडिओ बॉम्बने खळबळ
दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे विट्स हॉटेल खरेदीवरुन विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. या विट्स हॉटेलप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. ज्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आल्याची बातमी समोर आली. दुसरीकडे संजय राऊत यांनी शिरसाट यांचा एका पैशांनी भरलेल्या बॅगसह एक व्हिडिओ ट्वीट केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे, ज्यावरुन शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.
(नक्की वाचा: Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया )
'धुळे कॅश' कांड प्रकरणात अर्जुन खोतकर अडचणीत
अर्जुन खोतकर: जालन्याचे आमदार अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक थांबलेल्या विश्रामगृहातील कक्षात कोट्यवधी रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटेंची धुळ्याच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आता न्यायालयाकडून खोतकरांच्या स्वीय सहाय्यकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे त्यांच्याशी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वायूवेगाने दारुपरवाना, संदीपान भुमरेंवर चौफेर टीका
संदीपान भुमरे: शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे हे त्यांच्या भावजयीला एका दिवसात मिळालेल्या दारु परवान्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. संदीपान भूमरेंवर मंत्रीपदाचा गैरवापर करत आपल्या भावजयला दारू परवाना मिळवून दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी दारू परवाना प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाकडून विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना नोटीस देण्यात आली आहे.