रेवती हिंगमिरे: विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या विराट विजयानंतर विरोधक बॅक फुटवर गेले आहेत. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महाविकास आघाडीची युती फिस्कटणार का? मविआतील घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी सर्वात मोठे विधान केले आहे. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचे मनोबल जाणून घेण्यासाठी आज बैठका आहेत. चिंतन मनन करण्यापेक्षा आता पुढे गेले पाहिजे. गेल्या 70 वर्षात अशा निवडणूका पाहिल्या नाहीत. लोकांनी आम्हाला मतदान केलं मात्र ते आम्हांला मिळालं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढव्यात असं कार्यकर्त्यांना वाटते. कारण या निवडणुकांमध्ये इच्छुक जास्त असतात, असं संजय राऊत म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तसेच मुंबई महानगर पालिका हा कळीचा मुद्दा आहे. मुंबई महापालिका निवडणुका जिंकणे गरजेचे आहे, नाहीतर मुंबई वाटली जाईल. मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे. शिवसैनिकांचा स्वबळासाठी रेटा आहे. मुंबई पालिका स्वतंत्रपणे लढलो तर चांगला निकाल देऊ शकतो, अशी कार्यकर्त्यांची भावना असते. त्यानुसार आम्हाला एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, पण महविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न करणार.. असे सूचक संकेतही संजय राऊत यांनी दिलेत.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवरुनही टीका केली. मुख्यमंत्री तोंडाला येईल ते बोलतात. भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही सर्वजण होतो, समाजातील प्रत्येक घटक त्यामध्ये सहभागी होता, हा अर्बन नक्षलवाद आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. नक्षलवाद संपवल्याचे गृहमंत्री म्हणाले, तुम्ही त्यांना आव्हान देत आहात का? असंही ते म्हणाले.
(नक्की वाचा- Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)
दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही उत्तर दिले आहे. शिवसेनेला थांबवलंय कोणी? तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा पक्ष आहे. आम्ही आधी देखील सांगितलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काय करायचं ते ठरवू, असं ते म्हणालेत.