
विशाल पुजारी, कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर शहरात एका कुटुंबाने घरामध्ये 35 हून अधिक मांजरे पाळल्याचे उघडकीस आले. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेने या घरातून तब्बल 2 ट्रॉली कचरा बाहेर काढला असून तीन मांजरीही जप्त करण्यात आल्या आहेत. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर आणि नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नक्की वाचा : आदित्य ठाकरेंना अटक होणार! भाजप मंत्र्याच्या दाव्याने जबरदस्त खळबळ
समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात एका कुटुंबांने नियमबाह्यपणे पाळलेली मांजरे जप्त करण्यात आली आहेत. रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरी असलेल्या मांजरांवर ही कारवाई झाली. कारवाईवेळी एका मांजराने मनपा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा देखील घेतला. मांजरांना खाऊ घातलेले पदार्थ आणि इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी त्रस्त होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबाने ही मांजरे पाळली होती. घरात मांजरांना रोज घातलेल्या खाद्याचे अवशेष, मल, मूत्र, घरगुती कचरा अनेक दिवसांपासून घरात साचलेला होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत होता. आयरेकर गल्लीतील रहिवाशांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली.
तक्रार आल्यानंतर महानगरपालिकेने बुलबुले यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वच्छता ठेवली नाही. त्यामुळे ही कारवाई झाली. कारवाई मध्ये तीन मांजरे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेच आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.
(नक्की वाचा- Political News : महायुतीत दोस्तीत कुस्ती! 2029 विधानसभेसाठी आतापासूनच उमेदवारांची जुळवाजुळव?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world