लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नव्या लुकचा अर्थ काय?

शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेयांची मोठी परीक्षा आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी 2024 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. या वर्षात त्यांना लोकसभा, विधानसभा आणि गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांना सामोरं जायचं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत उद्धव  यांना पक्षाच्या पारंपारिक नाव आणि चिन्हांशिवाय मतदारांना सामोर जावं लागणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची मोठी परीक्षा असेल. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी ठाकरे यांनी आपल्या रणनितीमध्ये बदल केले असून त्याची सुरुवात कपड्यांपासून केली आहे.

काय आहे नवा लुक?

बाळासाहेब ठाकरे या नावाशी सामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचे पारंपारिक मतदार आजही जोडलेले आहेत. शिवसैनिकांच्या मनातील बाळासाहेबांची प्रतिमा अधिक गडद करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा लूक बदललाय.

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंच्या हातात देखील आता रुद्राक्षाची माळ दिसू लागलीय. उद्धव ठाकरेंचा हा नवीन लूक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसून येतीय, अशी भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

कधी केली सुरुवात?

अयोध्येत राम मंदिरात श्रीरामाची प्राणाप्रतिष्ठा झाली त्या दिवशी उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह नाशिकमध्ये होते. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात सहकुटुंब पूजा केली. त्यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उद्धव यांच्या हातात रुद्राक्षाची माळ बांधली. ती माळ अजूनही उद्धव यांच्या हातात आहे. 

`बाळासाहेब आणि रुद्राक्षाची माळ

बाळासाहेब ठाकरे कायम कुर्ता,पायजमा आणि अंगावर शाल परिधान करून असायचे.त्याचबरोबर त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षांची माळही असे. एका विशिष्ठ पद्धतीने ते माळ घेत असतं. त्यांच्या या खास पेहरावाचे अनेकजण फॅन होते. त्यांची परंपराच आपण पुढं चालवत आहोत, हे सर्वांवर ठसवण्यासाठी उद्धव यांनीही ही माळ वापरणे सुरु केलीय,असं मानलं जातंय. सध्या उद्धव ठाकरे जिथं जातायत तिथं त्यांच्या हातातील रुद्राक्षाची माळ लक्ष वेधून घेत आहे. 

Advertisement

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लाडक्या नेत्याचा पेहराव नेहमी लक्षात ठेवतात. त्याचं अनुकरण करतात. त्यांच्या पेहराव्यातील छोटासा बदलही त्यांच्या लक्षात येतो. साहजिकच उद्धव ठाकरे यांनी केलेला हा मोठा बदल सध्या चर्चेचा विषय बनलाय. उद्धव ठाकरेंचा हा बदललेला लुक मतदारांना आपल्याकडं खेचण्यात यशस्वी होईल का? हे या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईल.