गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg News : सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार' हत्ती पुन्हा सावंतवाडीच्या तांबुळी गावात पोहचला आहे. पुन्हा तो गोव्याच्या दिशेने जाणार की याच परिसरात जाणार हे महत्वाचं आहे. ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा तांबुळी परिसरात ओंकार दाखल झाला आहे. त्यामुळे जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुपारच्या सुमारास येथील जंगलात शेतकरी लाकडे गोळा करत असताना हा हत्ती त्यांच्या नजरेस पडला. ऐन हंगामातच हत्ती दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
ओंकारची मोठी दहशत...
सिंधुदुर्ग आणि गोवा सीमा भागात धुमाकूळ घालणारा ओंकार (Omkar) हत्ती सप्टेंबर २०२५ मध्ये तांबोशे (Tamboshe) परिसरात दाखल झाला होता. या काळात त्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान केलं होतं. सप्टेंबर २०२५ मध्ये तोरसे गावातून मध्यरात्री अंदाजे दोनच्या सुमारास ओंकार हत्ती तांबोशे येथे दाखल झाला होता. तांबोशे परिसरात दाखल झाल्यावर त्याने रवींद्र गवंडे यांच्या शेतातील पिकांवर ताव मारून मोठे नुकसान केलं.
गोवा-महाराष्ट्र सीमा भागात हेलपाटे मारणाऱ्या या हत्तीला गोव्यातून महाराष्ट्रात घालवण्यासाठी गोवा वन खात्याकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर याच ओंकार हत्तीने बांदा-तुळसाण परिसरात धुमाकूळ घातला. बांदा येथे नदीत अंघोळ करताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याची संतापजनक घटनाही घडली होती. तळकोकणात ओंकार हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून, त्याने चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. या हत्तीमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याने या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे