स्वानंद पाटील, बीड
अनेक जण संतती प्राप्तीसाठी नानाविधं प्रयत्न करीत असतात. अनेकदा शारीरिक व काही वैद्यकीय कारणांमुळे संतती प्राप्तीत अडथळा येऊ शकतो. मात्र कधी कधी अत्यंत क्लिष्ट आणि कठीण परिस्थिती असताना केवळ योग्य वैद्यकीय सल्ला मिळाल्याने दाम्पत्याचं बाळ होण्याचं स्वप्न पूर्ण होतं.
असेच उदाहरण बीडमधील परळी येथून समोर आलं आहे. एक दुर्मिळ आणि अपवादात्मक अशी केस समोर आली आहे. येथील या महिलेला एकच किडनी होती. तीदेखील निश्चित जागेवर नव्हती. त्याशिवाय अविकसित गर्भाशय व अन्य शारीरिक कमतरता या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीतही तीचे मनोधैर्य वाढवत व योग्य उपचार करून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्याम काळे यांनी एका महिलेचे आई होण्याचे स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे.
एक वर्षापूर्वी एक अतिशय गुंतागुंतीची, अवघड आणि वैद्यकीय क्षेत्रात दुर्मीळ केस त्यांच्याकडे आली होती. परळी तालुक्यातील रहिवासी असलेली साधारण २२ वर्षीय महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या केल्यानंतर तुम्हाला संतती होऊ शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं. ही महिला डॉ. काळे यांच्याकडे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये प्रथमच तपासणीसाठी गेली होती.
नक्की वाचा - Abrosexuality : तुम्ही देखील Abrosexual आहात का? जगभर चर्चेत असलेली काय आहे ही लैंगिक ओळख?
प्राथमिक तपासण्या केल्या. या प्राथमिक तपासणीमध्ये महिलेच्या शरीरातील त्यांनाही कधीच माहीत नसलेल्या बाबी समोर आल्या. संबधित महिलेला वयाच्या तब्बल 22 व्या वर्षी लक्षात आले की, आपल्या शरीरात केवळ एकच किडनी आहे आणि तीदेखील किडनीच्या जागी नसून ओटी पोटाजवळ आहे. स्त्रीअंडबीजकोश (ओव्हरी) याची पण एकच बाजू विकसित झालेली आहे. गर्भाशयाचे राऊंड लिगामेंट अविकसित आहे. युनिकॉर्नेट गर्भाशय असलेली ही महिला आहे.
एकंदरीत अविकसित गर्भाशय अशी शारीरिक अतिशय गुंतागुंत आणि क्लिष्ट अशी परिस्थिती तपासणीमध्ये आढळून आली. मात्र डॉ. श्याम काळे यांनी त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव पणाला लावून या महिलेची व कुटुंबाची मनोधारणा वाढवली. संतती प्राप्तीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन या महिलेला नियमित उपचार सुरू केले. प्राथमिक उपचार सुरू केल्यानंतर चार महिन्यातच गर्भधारणा झाली. या रुग्णाचे शारीरिक वैगुण्य लक्षात घेऊन डॉ. काळे यांनी संपूर्ण प्रसूतीपर्यंत तिचे मनोधैर्य खचू दिले नाही.
नक्की वाचा - तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल
त्याचबरोबर नियमित उपचार व कोणत्याही अवघड अशा प्रकारच्या चाचण्यांमध्ये रुग्णाला न गुंतवता वैद्यकीय ज्ञान व अनुभवाचा कस लावून काळजी घेतली. संपूर्ण प्रसूती काळ नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर यशस्वीपणे या महिलेची दोन दिवसांपूर्वीच डॉ. काळे यांच्या रुग्णालयातच प्रसूती करण्यात आली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तोही पूर्ण वाढ, पूर्ण वजन व पूर्ण प्रसूती काळ घेत यशस्वीरित्या ही प्रसूती करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. प्रसूतीनंतर हे बाळ जवळपास तीन किलो वजनाचे प्रसुत झाले. अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असलेली ही केस यशस्वीरित्या हाताळून या महिलेला आणि त्या कुटुंबाला संततीप्राप्तीचा आनंद या डॉक्टरांनी मिळून दिला आहे.
दुर्मिळ प्रकरण पण अनुभवाने मिळाले यश
दरम्यान याबाबत माहिती देताना डॉ. श्याम काळे यांनी सांगितलं की, मुलेरियन अबनोरमॅलिटी अशा प्रकारची ही केस आहे. अशा केसमध्ये जन्मजात प्रजनन अवयवांची कमतरता असू शकते. या केसमध्ये अनेक गुंतागुंती होत्या. मात्र असे असले तरीही योग्य उपचार आणि काळजी घेत या महिलेला नऊ महिन्यापर्यंतचा काळ नियमित देखरेखीखाली ठेवण्यात आले. उपचारादरम्यान आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्याचे त्यांनी सांगितले.