सौरभ वाघमारे, सोलापूर
Solapur News : सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गर्भवती मातांना आमिष दाखवून खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या बदल्यात रुग्णालयाकडून आशा सेविकांना कमिशन आणि अन्य आमिषे दिली जात असल्याची माहिती आहे.
चौकशीतून असे निष्पन्न झाले आहे की, रुग्णांच्या उपचारात झालेल्या एकूण बिलाच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही कमिशन म्हणून आशा सेविकांना दिली जात होती. केवळ कमिशनच नाही, तर भेटवस्तू, महागड्या हॉटेलमध्ये जेवण अशा विविध गोष्टींचे आमिष दाखवून आशा सेविकांना हे कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते.
(नक्की वाचा- धक्कादायक! पनवेल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर बलात्काराचा गुन्हा, बळजबरीने गर्भपात केल्याचाही आरोप)
श्रेयस नर्सिंग होम हॉस्पिटलकडून हे सर्व केले जात होते. शासकीय आरोग्य सेवेऐवजी खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आशा सेविका गर्भवती महिलांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, श्रेयस नर्सिंग होमने आशा सेविकांना संपर्क साधण्यासाठी चक्क व्हॉट्सअॅपचा ग्रुप तयार केला होता. याच ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारचे आमिष दाखवले जात होते, असे चौकशीत उघड झाले आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा - ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहताच घराचं दार बंद केलं; वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापा)
या प्रकरणी महापालिकेने गंभीर दखल घेत या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील असलेल्या आशा सेविका आणि श्रेयस नर्सिंग होमच्या डॉक्टरांना देखील महापालिकेने नोटीस पाठवून कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा मागितला आहे. यावर लवकरच योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.