लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (DCC) तब्बल 238 कोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेला मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - मोठी बातमी! 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?
या आदेशानंतर सोलापूरातील बडे नेतेमंडळी अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह इतर 35 जणांची नावं असून त्यांना 238 कोटींच्या नुकसानीसाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. या प्रकरणात एकूण 44 आरोप तपासण्यात आले आहे. त्यापैकी 27 आरोपांसाठी बँकेच्या माजी संचालक मंडळ, अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे.
नक्की वाचा - राज्यातील 3,513 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, भाजपचा एकही उमेदवार नाही!
तपास अहवालानुसार, बँकेकडून अनियमित पद्धतीने कर्ज वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये ठराविक लोकांना लाभ मिळाला. या घोटाळ्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम झाला आहे. बँकेच्या तपासणीच्या प्रक्रियेवर सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान दिलीप सोपल यांच्यावर टीका करत “जनतेची फसवणूक करणाऱ्या लोकांना निवडून देणार का?” असा सवाल उपस्थित केला होता.