महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या पराजयाशिवाय आर्थिकदृष्ट्याही मविआसह राज्यातील प्रादेशिक पक्षांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील 4136 उमेदवारांपैकी तब्बल 3513 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे. मनसे, वंचित आणि रासपच्या 95 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने, या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, ठाकरे गट या पक्षांच्या किमान 1 ते 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे. ज्याच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेले नाही. निवडणूक लढण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून काही रक्कम अनामत अर्थात डिपॉझिट म्हणून घेतली जाते. या उमेदवारांना वैध मतांच्या एक षष्ठांशही मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केली जाते.
नक्की वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणाला घराणेशाहीचा विळखा; 288 पैकी 237 आमदार घराणेशाहीचे...
राजकीय प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणे, ही पक्षाची मोठी नामुष्की समजली जाते. या निवडणुकीत भाजप वगळता सर्व छोट्या, मोठ्या, सत्ताधारी, विरोधी पक्षांवर डिपॉझिट जप्तीची नामुष्की आली आहे. बहुजन समाज पक्ष, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), बहुजन रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना, स्वाभिमानी पक्ष, संभाजी ब्रिगेड, एआयएमआयएम अशा छोट्या-मोठ्या पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार) शिवसेना (ठाकरे) राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे 20 पक्ष आणि संघटनांच्या शेकडो उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अपक्ष डमी उमेदवार देऊन विरोधकांची मते घेण्यासाठी देखील बहुतांश उमेदवार उभे करण्यात आले होते. अशा 2086 उमेदवारांपैकी 2049 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
केव्हा होतं डिपॉझिट जप्त?
- निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम घेतली जाते
- उमेदवारांना एक षष्ठांश मतं मिळणं बंधनकारक असतं
- एक षष्ठांश मतंही न मिळवल्यास डिपॉझिट जप्त होतं
- डिपॉझिट जप्त होणं, पक्षाची नामुष्की समजली जाते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world