सौरभ वाघमारे, सोलापूर:
Solapur Bribe Case: निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महसूल विभागातील नायब तहसीलदारावर पुणे अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. मंडळ अधिकाऱ्याचे थकीत वेतन मंजूर करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपये स्वीकारताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे (वय ५२) यांना सोमवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अटक करण्यात आली. या धडक कारवाईची महसूल विभागात जोरदार चर्चा होत आहे. उत्तर सोलापूर तहसील अंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे वेतन काही काळापासून प्रलंबित होते.
Jalgaon News: नको तेच घडलं! बेपत्ता 9 वर्षीय मुलीचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला; चाळीसगाव हादरलं
हे वेतन काढून देण्यासाठी नायब तहसीलदार हेडगिरे यांनी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत तक्रारदाराने ५ डिसेंबर रोजी पुणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला आणि ४० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले.
कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने जुळे सोलापूर येथील शिवरत्न नगरमधील निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत सुमारे ६० हजार रुपयांची रोकड तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याची माहिती आहे. या प्रकरणी सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world