सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापूर शहरातून शिवजयंतीच्या निमित्ताने एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. डीजे आणि डॉल्बीच्या आवाजात शिवजयंती साजरी करण्याच्या सध्याच्या ट्रेंडला फाटा देत, सोलापूरच्या मराठा वस्ती परिसरातील एका मंडळाने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना सोलापूरच्या मराठा वस्ती परिसरातील एका मंडळाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. "डीजे-मुक्त शिवजयंती" हा ठाम संकल्प गेल्या सात वर्षांपासून राबवत, या मंडळाने समाजासमोर एक नवा पायंडा घातला आहे. डीजे-डॉल्बीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा महिलांच्या सन्मानासाठी खर्च करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
डीजेचा खर्च टाळून महिलांचा सन्मान
दरवर्षी शिवजयंतीला लाखो रुपये डीजे आणि वाद्यांवर खर्च केले जातात. मात्र, या मंडळाने या खर्चाला फाटा दिला आहे. डीजेवर होणाऱ्या खर्चातून मंडळाने परिसरातील हजारो महिलांना मराठमोळा पारंपरिक पोशाख भेट म्हणून दिला आहे. मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे, समाजात सभ्यता टिकवणे आणि डीजेच्या अतिरेकामुळे तरुणाईवर होणारे दुष्परिणाम टाळणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
सात वर्षांची सातत्यपूर्ण परंपरा
केवळ एकदाच नाही, तर गेल्या सात वर्षांपासून हे मंडळ कोणत्याही प्रकारचा डीजे न लावता शिवजयंती साजरी करत आहे. सुरुवातीला या निर्णयाला काहींनी विरोध केला होता, मात्र आता संपूर्ण सोलापूर शहरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे उत्सवातील गोंधळ कमी झाला असून एक कौटुंबिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: डोंबिवलीत बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश, रुग्णांच्या जीवाशी खेळ; बिहार कनेक्शन उघड)
तरुणाईला नवी दिशा
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवजयंती हा सण नसून तो एक विचार आहे. डीजेच्या दणदणाटात महाराजांचे विचार हरवून जाऊ नयेत, यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. महिलांना भेट दिल्या जाणाऱ्या पोशाखातून त्यांना उत्सवाचा भाग करून घेतले जात असून, तरुणांनाही विधायक कामाची दिशा मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world