सौरभ वाघमारे, सोलापूर
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सुरुवातीपासूनच घोळ दिसून येत आहे. अर्ज दाखल करण्याच्य शेवटच्या दिवशीही तशीच परिस्थिती आहे. काही जागांवर महाविकास आघाडीच्या दोन-दोन पक्षांना आपले उमेदवार दिले आहेत. तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला असताना देखील एबी फॉर्म दिला नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार दिलीप माने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने दिलीप माने हे बराच वेळ तहसील कार्यालयातच थांबून होते. अखेर त्यांना अर्ज दाखल न करताच माघारी फिरावं लागलं आहे.
(नक्की वाचा - राष्ट्रवादी पक्षफुटीवर शरद पवार पहिल्यांदा एवढं बोलले, बारामतीत मोठं भाष्य)
सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसने दिलीप माने आणि शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगला होता. दिलीप माने आणि अमर पाटील यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता होती. मात्र दिलीप माने यांना अर्ज दाखल न केल्याने अमर पाटील येथून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील.
(नक्की वाचा- आर आर पाटलांनी केसाने गळा कापला; अजित पवार असं का म्हणाले?)
अमर पाटील यांनी भरला अर्ज
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी एबी फॉर्मसहीत सोमवारी अर्ज दाखल केला सोलापुरातील शिवसेना भवन परिसरात अमर पाटील यांनी मोठ शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. शिवसेना भवन ते दक्षिण तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. मात्र यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.