देवा राखुंडे, प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर सोमवती यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी गडावर पाहायला मिळते. सोमवती यात्रेनिमित्त श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर स्नानासाठी जात असतो. आज सोमवारी दुपारी एक वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ होणार आहे, मात्र देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या छोट्या टॅम्पोला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झालेत.देवदर्शनाला जाताना पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अशोक लेलंड कंपनीचा छोटा टॅम्पो आणि टाटा कंपनीचा टेम्पो यांच्यात हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झालेत. ही घटना बेलसर वाघापूर रस्त्यावर घडली आहे. या अपघातात छोट्या टॅम्पोचा चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे (वय 35) आणि आशाबाई बाळकृष्ण जरे (वय 50) या दोघांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - Car accident: अभिनेत्री उर्मिला कानेटकरच्या कारला अपघात, एकाचा मृत्यू, उर्मिलाही जखमी
मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील जरेवाडी येथून MH14LL1498 क्रमांकाच्या अशोक लेलँड कंपनीच्या छोट्या टॅम्पोमधून हे भाविक जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री निघाले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वाघापूर बेलसर रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा टेम्पो गाडीने या यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अशोक लेलँडमधील भाविक जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर मंगल तोत्रे, ज्ञानेश्वर तोत्रे, तानाजी तोत्रे, अनुष्का तोत्रे, राहुल तोत्रे, विलास तोत्रे, बाळू तोत्रे, अश्विनी तोत्रे, तनिष्का तोत्रे, ओंकार करंडे, मीरा करंडे, मंगल जरे, बाबाजी करंडे, जितेंद्र तोत्रे जखमी झाले आहेत. जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.