लक्ष्मण सोळुंके, जालना
पुण्यनगरी वृत्तपत्राचे मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक जाहेद शहा यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अपहरणानंतर मुलाला व कुटुंबाला धमकी देत 50 हजारांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. भोकरदन शहरात 13 जुलै रोजी ही घटना घडली.
13 जुलै रोजी शहा यांचा मुलगा सकाळपासून गायब होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्यापूर्वी शहा यांच्या बँक खात्यातून पैसे कमी झाले. शहा यांनी तपासणी केली असता ती रक्कम मुलाच्या बँक खात्यात व त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने कृष्णा सहाणे नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.
( नक्की वाचा: चटके दिले, उपाशी ठेवलं... चपाती नीट बनवता येत नसल्याने आईकडून लेकीचा छळ )
कृष्णा सहाणे याची शहा यांच्या मुलासोबत वाहन शिकवण्याच्या निमित्ताने ओळख झाली होती. याच कृष्णा सहाणे यांने शहा यांच्या मुलाचं अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकून बँक खात्यातून 50 हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याचा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. शहा यांनी रकमेबाबत विचारणा केल्यानंतर कृष्णा सहाणे, रोहित इंगळे, योगेश बरडे यांनी शहा व इतरांना मारहाण केली.
( नक्की वाचा: नागपुरातील भाजप नेत्याचा मुलगा ड्रग तस्करी प्रकरणी अटकेत )
अखेर शहा यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर भोकरदन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अटकेच्या कारवाईसाठी गेले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील दगदफेक करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी आरोपींची दहशत मोडीत काढण्यासाठी त्यांना अटक करत भोकरदन पोलीस ठाण्यापासून शहरातील रस्तावरून न्यायालयापर्यंत त्यांची धिंड काढली. न्यायालयालयाने आरोपींची 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत.