Amravati महिन्याला मिळायचे फक्त 150 रुपये, आज 15 कोटींची उलाढाल! अमरावतीच्या शेतकऱ्याला 'ऑक्सफर्ड'मधून बोलावणं

Amravati News: या मराठमोळ्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकण्यासाठी आता थेट जगप्रसिद्ध 'ऑक्सफर्ड' विद्यापीठाने त्यांना निमंत्रण धाडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Amravati News: त्यांनी आतापर्यंत देशातील 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News:  महिन्याला अवघे 150 रुपये कमावणारा एक तरुण आज 15 कोटी रुपयांच्या साम्राज्याचा मालक बनला आहे. हे ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटत असले, तरी अमरावतीच्या मातीत एका शेतकऱ्याने हा चमत्कार प्रत्यक्षात घडवून दाखवला आहे. आणखी कौतुकाची गोष्ट म्हणजे, या मराठमोळ्या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकण्यासाठी आता थेट जगप्रसिद्ध 'ऑक्सफर्ड' विद्यापीठाने त्यांना निमंत्रण धाडले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मासला गावचे रहिवासी असलेले 57 वर्षांच्या रवींद्र मेटकर यांची ही थक्क करणारी कहाणी आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ते मार्गदर्शन करणार आहेत. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) या विषयावर आधारित असलेल्या ऑक्सफर्डमधील या परिषदेत मेटकर आपली शेतीतील प्रयोगांची शिदोरी जगासमोर मांडतील.

Advertisement

150 रुपयांपासून 15 कोटींचा प्रवास

रवींद्र मेटकर यांनी अमरावती विद्यापीठातून एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेतीमध्येच काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. 1994 मध्ये त्यांच्या कुटुंबाने भंडारा जिल्ह्यात एक एकर जमीन खरेदी केली. तिथूनच त्यांच्या प्रयोगांना सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्यांचे उत्पन्न महिन्याला केवळ 150 रुपये इतके होते. मात्र, जिद्द आणि आधुनिक विचारांच्या जोरावर त्यांनी आज 50 एकरवर आपले शेतीचे साम्राज्य उभे केले आहे.

( नक्की वाचा : Pune News: बाबो! 47 लाखांच्या नोकरीवर मारली लाथ; पुण्याच्या या तरुणाने असं का केलं? सोशल मीडियावर चर्चाच चर्चा )

शेतीचा 'मेटकर पॅटर्न' काय आहे?

रवींद्र मेटकर यांनी एक गोष्ट लवकर ओळखली होती की, शेतकरी बाजारातील भाव ठरवू शकत नाही, पण शेतीचा खर्च नक्कीच कमी करू शकतो. त्यांनी स्वतःची खते स्वतः तयार करायला सुरुवात केली. आज त्यांच्या शेतात आंबे, मोसंबी, आवळा, केळी आणि सुपारी यांसारखी नगदी पिके घेतली जातात. पिकांसोबतच त्यांनी कुक्कुटपालनाचा (Poultry) मोठा व्यवसायही उभा केला आहे.

कमी खर्च आणि शाश्वत शेती

त्यांच्या यशाचे मुख्य सूत्र म्हणजे 'कमी खर्च'. ते आपल्या पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य स्वतःच तयार करतात आणि शेतातील कचऱ्यापासून दर्जेदार खत बनवतात. यामुळे बाजारातून महागडी खते विकत घेण्याची गरज उरत नाही. हाच 'शाश्वत शेती'चा मंत्र ते आता ऑक्सफर्डमध्ये जगाला देणार आहेत. हवामान बदलाच्या काळात शेती कशी टिकवून धरावी, यावर ते तिथे मार्गदर्शन करतील.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
 

50 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रवींद्र मेटकर हे केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी आतापर्यंत देशातील 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. "मी जर 150 रुपयांवरून 15 कोटींपर्यंत पोहोचू शकतो, तर इतर शेतकरीही हे नक्कीच करू शकतात," असा विश्वास ते व्यक्त करतात. त्यांच्या या जिद्दीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सलाम मिळत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासानं संपूर्ण अमरावती जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article