Pune News: पुण्यातील आयटी क्षेत्रात सध्या एका तरुणाच्या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे. हिंजवडी असो वा मगरपट्टा, जिथे इंजिनिअर्स लाखो रुपयांच्या पॅकेजसाठी दिवसरात्र मेहनत करतात, तिथे एका तरुणाने समोर आलेली मोठी संधी चक्क नाकारली आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज साधेसुधे नसून तब्बल 47 लाख रुपयांचे होते. एका प्रतिष्ठित कंपनीने दिलेली ही ऑफर या इंजिनिअरने का नाकारली, याचे कारण ऐकून अनुभवी लोकही चक्रावून गेले आहेत.
पुण्यातील एका आयटी प्रोफेशनलने घेतलेला हा धाडसी निर्णय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वनेश माळी असे या तरुणाचे नाव असून त्याला एका मोठ्या कंपनीकडून सीनियर पदासाठी 47 लाख रुपये प्रतिवर्ष इतक्या पगाराची ऑफर मिळाली होती. कंपनी नावाजलेली होती आणि पगारही स्वप्नवत होता, तरीही वनेशने या नोकरीला नकार दिला.
नकार देण्यामागचे प्रामाणिक कारण
वनेश माळी याने हा निर्णय का घेतला, याबद्दल स्वतःच खुलासा केला आहे. त्याला मिळालेली ऑफर ही एका सीनियर पदासाठी होती. मात्र, वनेशला असे वाटले की, त्या पदासाठी लागणारी कौशल्ये आणि अनुभव सध्या त्याच्याकडे पूर्णपणे नाहीत. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत, त्या जबाबदारीचे ओझे घेण्यापेक्षा त्याने सध्या माघार घेणे पसंत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
मोठा पगार म्हणजे मोठ्या जबाबदाऱ्या
स्वत:च्या निर्णयाचे समर्थन करताना वनेशने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणतो की, जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला 47 लाख रुपये पगार देते, तेव्हा त्यांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षाही तितक्याच मोठ्या असतात. अशा हाय-प्रोफाईल रोलमध्ये कामाचा दबाव जास्त असतो आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आपण अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही, तर ते स्वतःच्या करिअरसाठी आणि कंपनीसाठीही नुकसानकारक ठरू शकते. म्हणूनच हे रिस्क घेण्यापेक्षा त्याने ही ऑफर नाकारली.
Career Update:
— Vanesh Mali (@vaneshmali) March 20, 2026
I recently got a fantastic job offer of Rs. 47 LPA in Pune for a senior role.
The package was good and the company was great, but the position demanded skills I don't fully possess yet.
I politely rejected the offer, explaining that I am not ready to deliver at…
सोशल मीडियावर दोन गट
वनेशचा हा निर्णय समोर आल्यानंतर इंटरनेटवर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अनेकांनी त्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. स्वतःच्या क्षमतेची जाणीव असणे आणि फसवणूक न करता स्पष्ट नकार देणे, हे खऱ्या प्रोफेशनल माणसाचे लक्षण असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, काही लोकांनी याला भीती मानले आहे. नवीन संधी आणि आव्हाने स्वीकारल्याशिवाय प्रगती होत नाही, असे मत दुसऱ्या गटाने मांडले आहे.
पुण्यासारख्या स्पर्धात्मक शहरात जिथे प्रत्येकजण धावपळीत आहे, तिथे वनेश माळीनं घेतलेला हा संयमी निर्णय अनेकांना विचार करायला लावणारा ठरला आहे.
( स्पष्टीकरण : ही बातमी सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची कोणतीही पृष्टी करत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world