Video - राज यांच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी 'सुपाऱ्या' फेकल्या, मनसैनिकांनी धडा शिकवण्याचा 'विडा' उचलला

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना प्रत्येक ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना प्रत्येक ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असे विधान केल्यानंतर मराठा आंदोलक संतापले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना टाडा,पोटा आणि रासुका लावून अटक करा अशी मागणी केलीय. शुक्रवारी राज ठाकरे बीडमध्ये आले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर सुपाऱ्या फेकून निषेध केलाय. आरक्षणाच्या मुद्दावरूनच  शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी ही सुपारीफेक केली आहे.

सुपारी बहाद्दर चले जावच्या घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी संध्याकाळी बीडमध्ये पोहोचले. जालना रोड परिसरात असणाऱ्या अन्विता हॉटेलमध्ये बैठक घेण्यासाठी राज ठाकरे हे आले होते. या बैठकीला जाण्यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षाने त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यावेळी शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सुपाऱ्या फेकून त्यांचा निषेध केला. 'राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळे ते नेमकी कुणाची सुपारी घेऊन आले आहेत'असा सवाल करत शिवसेना उबाठा पक्षाने आंदोलन केले. शिवसेना(उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी म्हटले की, " गट राज ठाकरेंनी लोकसभेला सुपारी घेतली होती, तशीच त्यांनी विधानसभेसाठीही सुपारी घेतली आहे. ही कोणाची सुपारी गेतलीय असा जाब आम्ही विचारायला आलो आहोत. जरांगे पाटील यांचे चांगले आंदोलन सुरू आहे, त्याला राज ठाकरे यांनी विरोध केलाय. कोणाची सुपारी घेऊन हा विरोध करताय असा सवाल आम्ही राज ठाकरेंना विचारतोय."

Advertisement

मनसेच्या नेत्यांचे X द्वारे इशारे

सुपारीफेक आंदोलनावर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या पक्षाचे संदीप देशपांडे यांनी X या सोशल मीडिया मंचावर पोस्ट करत शिवसेना(उबाठा) पक्षाला इशारा दिलाय. 'उ.बा.ठा सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू' असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

Advertisement

तर मनसेच्याच गजानन काळे यांनीही X वर इशारा देताना म्हटलंय की , उबाठा मस्ती आली आहे का?? पान आणि चूना तयार आहे ... व्याजासहीत परत फेड करणार ... 
 

Advertisement