प्रसाद शिंदे, अहिल्यानगर
अहिल्यानगरमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान डीजे वाजवल्यास डीजे मालक, मंगल कार्यालयाचे मालक वधू-वरांचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच हायकोर्टाने दिलेल्या डेसिबल पेक्षा जास्त डेसिबल आवाज असणाऱ्या डीजे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरांमध्ये मंगल कार्यालय असोसिएशन व पोलीस प्रशासनाची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात डीजे वाजवल्यास मंगल कार्यालयाचे मालक वधू-वरांचे नातेवाईक व डीजे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर यावर म्हणाले की, हा अत्यंत चुकीचा निर्णय असून ज्याच्या घरी शुभकार्य असते तो मंगल कार्यालय भाड्याने घेतो. आम्ही आमच्या मंगल कार्यालयाच्या बोर्डवर देखील सूचना लिहिलेली आहे की मंगल कार्यालयात डीजे वाजवू नये. रस्त्यावर देखील डीजे वाजवायचा असेल तर पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी, असं आम्ही स्पष्टपणे म्हणणं मांडलेलं आहे.
नक्की वाचा - Pune News : तानाजी सावंत यांच्या सुपुत्राचं अपहरण नाही तर स्वखुशीने 68 लाख खर्च करून बँकॉक टूर
कोणत्याच मंगल कार्यालय मालकांकडे डीजे नसून ते ज्याच्या घरी लग्न आहे ते मंडळी डीजे बाहेरून आणतात. यामध्ये विनाकारण मंगल कार्यालय मालक भरडले जात आहेत. चुकी एकाची आणि शिक्षा एकाला. जखम मांडीला आणि इलाज शेंडीला असा हा प्रकार असल्याचं फुलसौंदर यांनी म्हटलं आहे. पोलीस प्रशासनाने डीजे मालकांवरची गुन्हे दाखल करावे. कोणत्याही मंगल कार्यालयाच्या मालकांना त्रास झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील मंगला कार्यालय असोसिएशनचे अध्याक्ष भगवान फुलसौंदर यांनी दिला.
नक्की वाचा - Uday Samant Letter : उदय सामंतांच्या त्या पत्रात नेमकं काय? उद्योगमंत्र्यांना का द्यावे लागले स्पष्टीकरण?
दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहरातील मंगल कार्यालयाचे मालक व चालक यांच्याशी बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मान्यतेपेक्षा जास्त आवाज असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा देखील सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील सुरू असतो. बरेच ठिकाणी डीजे वाजत राहिल्याने विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास होतो. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक घेण्यात आली होती. आम्ही सर्वांना आदेश दिले आहेत की रात्री दहा नंतर कुठल्याही परिस्थितीत डीजेला मान्यता दिली जाणार नाही. रात्री दहा नंतर कुठेही साऊंड सिस्टिम चालू असल्याचं आढळल्यास संबंधित मंगल कार्यालयाचे मालक डीजे चालक जर लग्न असेल तर वधू-वर दोघांचेही पालक या सर्वांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी म्हटलं आहे.