Dhananjay Munde resigns : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 84 दिवस उलटून गेल्यानंतर आज 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यापासून देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अगदी सत्ताधारी नेते, सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधकांकडून केली जात होती. अखेर आज त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता नवी अपडेट समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनजंय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे यांचं निवासस्थान 'सातपुडा' बंगल्यावर घेतलेल्या बैठकीची चौकशी करण्याची मागणी सुरेश धसांकडून केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांच्या हत्येचं नियोजन खूप आधीपासून सुरू होतं. 14 जून रोजी धनंजय मुंडे यांच्या परळीतील निवासस्थान सातपुडा येथे एक बैठक झाली होती. याच बैठकीत वाल्मिक कराडांनी प्लानिंग केलं होतं. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुनील बिक्कड, अधिकारी शुक्ला, काळकुटे, वाल्मिक कराड आणि स्वत: धनंजय मुंडे उपस्थित असल्याचा दावा सुरेश धसांकडून केला जात आहे. या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना हा प्रकार कळवला. यावर कंपनीच्या वरिष्ठांनी दोन कोटींवर निश्चिती दर्शवली होती. मात्र निवडणुकीसाठी तातडीने 50 लाखांची मागणी करण्यात आली होती. यावेळी कंपनीने त्यांना 50 लाख दिले होते. ते पैसे धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मिक कराड हे माहीत नसल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं होतं. मात्र मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी अशा बैठका झाल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अप्रत्यक्षपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे.
नक्की वाचा - Rohit Pawar : 'मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का?' 'ते' फोटो पाहून रोहित पवारांचा राग अनावर
6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. आपल्या गावातील कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याचे फोटो 3 मार्चला प्रसारमाध्यमातून समोर आले होते. ते फोटो पाहून महाराष्ट्र हादरून गेला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधूनही सहआरोपी करण्याची मागणी...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांसह सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही ही मागणी जोर धरत आहे.