राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिंपोळा-खुंटेफळ पाईपलाईन आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभ झाला. या कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता पुन्हा एकदा निशाणा साधला. काही राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाल्याची टीका सुरेश धस यांनी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस यांनी म्हटलं की, बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे, असं काही जण म्हणत आहेत. मात्र या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं, रखमाजी पाटील गावडे यांना निवडून दिले, ते धनगर समाजाचे होते. केशरकाकू क्षीरसागर यांना निवडून दिलं. बबनराव ढाकणे यांना निवडून दिलं. प्रमोद महाजन यांना निवडून दिलं. गोपीनाथ मुंडे यांना निवडून दिलं. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता या जिल्ह्याने दिला. अनेक राजकारण्यांना या जिल्ह्याने घडवलं. प्रशासकीय आधिकारी म्हणून राजेश कुमार, आनंद लिमये, सुनील केंद्रेकर, नवलकिशोर राम, पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी, लखमी गौतम अशा अधिकाऱ्यांनी इथे काम केले. मात्र काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतीमा आज मलीन झाली होती.
(नक्की वाचा- Pankaja Munde : 'तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी....', फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंची जोरदार फटकेबाजी)
संतोष देशमुख प्रकरणात तुमची कणखर भूमिका आवडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतात सुरेश धस यांनी म्हटलं की, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात जी कणखर भूमिका तुम्ही घेतली ती सगळ्यांना आवडली. तुम्ही म्हणाले कुणालाच सोडणार नाही यावर आमचा विश्वास आहे. मात्र अजून राख, वाळू, भूमाफिया यांना मोक्का लागला पाहिजे ही आमची विनंती आहे. तुम्ही तो लावाल ही आमची खात्री आहे, असा विश्वास देखील सुरेश धस यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, धनंजय मुंडेंवर शस्त्रक्रिया; नेमकं काय झालं?)
माझ्यावर हरळ उगवली असती
राजकीय प्रवासाबाबत बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं की, फडणवीस साहेब माझ्यावर हरळ उगवली असती. 2019 पासून माझ्याविरोधात आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट कारस्थाने रचली गेली. वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण माझ्यामागे दत्त म्हणून उभे राहिलात, हे सगळ्या लोकांना सांगतो.
2019 ला बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूने होता, मात्र पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. आपल्याविरोधात राजकीय, कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा कट रचला गेला. मात्र तुम्ही कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला त्याला तोड नाही. यावर तुम्ही मात केली. त्याला बिनजोड पैलवान म्हणतात, असं सुरेश धस यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार? लोकसभेत नेमकं काय घडलं?)
माझ्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद
"मी दीवार चित्रपट पाहिला होता, त्यात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर भाऊ भाऊ असतात. निरुपा रॉय त्यांची आई असते. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखलेत आणि अमिताभ बच्चन जरा झंटाफंटा दाखवलेत. अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतात मेरे पास बंगला है, गाडी है, नौकर हे तुम्हारे पास क्या है? त्यावेळी शशी कपूर म्हणाले होते मेसे पास मा है. तसंच लोक मला म्हणतात तेरे पास क्या है. तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब हा आशीर्वाद असाच ठेवा, अशी विनंती सुरेश धस यांनी केली.