Tamhini Ghat Pune Friends Group Thar Accident: रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो, मात्र या घाटात वारंवार अपघात झाल्याच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी रात्री ताम्हिणी घाटात अशीच एक भीषण अपघाताची दुर्घटना घडली ज्यामध्ये सहा जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कष्टाने स्वतःचं साम्राज्य उभं केलेल्या तरुणाने नवी कोरी थार घेतली. याच थारमध्ये बसून मित्रांसोबत कोकण ट्रीप करण्याचा प्लॅन त्याने केला, मात्र नियतीच्या क्रुर खेळामुळे ताम्हिणी घाटात त्यांचा प्रवास कायमचा थांबला. या तरुणांसोबत नेमकं काय घडलं? वाचा....
शून्यातून साम्राज्य, पण नियतीने संपवलं
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण नवी थारला घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातासोबतच कष्टाने मोठे झालेले, स्वत:चे व्यवसाय थाटत नवी ओळख निर्माण करणारे सहा तरणीबांड मुलं कायमचीच हिरावली गेली.

नक्की वाचा: Tamhini Ghat Accident: 2 दिवस दरीत, एका फोनमुळे तपास; ताम्हिणी घाटात कसे पोहोचले पोलीस? हादरवणारी स्टोरी
अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी साहिल गोठे हा अत्यंत कष्टाने मोठा झालेला तरुण. साहिलने अगदी कमी वयात व्यवसायात पाऊल ठेवत पुणे शहरात मोमोजचे स्टॉल लावले. त्याच्या प्रामणिक कष्टाला यश मिळत गेले अन् बघता बघता त्याने शहरात चार ठिकाणी आपल्या शाखा सुरु केल्या. याच पैश्यातून त्याने पुण्यामध्ये फ्लॅटही घेतला. व्यवसायाला उभारी मिळत असतानाच वीस दिवसांपूर्वी त्याने नवी थार खरेदी केली, याच थारने त्याच्यासह त्याच्या 5 मित्रांचा घात केला.
चला कोकणात फिरायला...
आपल्या नव्या थारमधून मित्रांना फिरवण्यासाठी साहिलने तीन दिवसांच्या कोकण ट्रीपचा प्लॅन आखला. त्याच्यासोबत शिवा माने, श्री कोळी, ओमकार कोळी, पुनीत शेट्टी आणि प्रथम चव्हाण हे मित्रही कोकणात जाण्यासाठी तयार झाले. सोमवारी रात्री उशिरा हे सर्व तरुण कोकणाकडे निघाले, मात्र ताम्हिणी घाटातील एका वळणावर या सर्वांचा प्रवास थांबला. कष्टाने मोठं होण्याची, यशस्वी व्यवसाय उभारणारी ही तरुण मुले नियतीने कायमचीच हिरावून घेतली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनावर संताप...
दरम्यान, या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनीही प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणाहून ही कार कोसळली त्या परिसरात मोडकळीस आलेले बॅरिगेट्स होते. जर ते बॅरिगेट्स आज सुरक्षित आणि मजबूत असते तर आमच्या गावातील तरुण कुठेतरी बचावले असते, त्यामुळे या घटनेला सर्वस्वी जबाबदार दुर्लक्षित प्रशासन असल्याचा आरोप आणि संताप मृत तरुणांच्या गावकऱ्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world