भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये IT क्षेत्राची (Pune IT Jobs) मोठी भूमिका असून. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या टीसीएसने पुण्यातील 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Pune TCS Layoffs). टीसीएस ही नामवंत कंपनी असून कर्मचाऱ्यांप्रती सहानुभूती बाळगणारी कंपनी म्हणून तिचा लौकीक आहे. मात्र याच कंपनीवर कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने हा आरोप केला आहे. NITES (नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट) असं या संघटनेचे नाव असून त्यांनी TCS वर हा आरोप केला आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. हा सगळा प्रकार अत्यंत चुकीचा असून या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती करण्यात आली आहे.
नक्की वाचा: TCS Layoffs: 'टीसीएस'मधून 80 हजार कर्मचाऱ्यांना काढले? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ
NITES ने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले आहे ?
NITES ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टीसीएसने घेतलेल्या या निर्णयामुळे अनुभवी लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नोकरी गमावलेले बहुतांश कर्मचारी मध्यम ते वरिष्ठ स्तरावरील असून, ते TCS साठी 10 ते 20 वर्षे काम करत होते. यापैकी अनेक कर्मचारी 40 वर्षांवरील असून त्यांच्यावर कर्ज, मुलांचे शिक्षण आणि वृद्ध पालकांचा सांभाळ अशा विविध जबाबदाऱ्या आहेत. या सगळ्यांना अचानक झटपट नोकऱ्या मिळणे कठीण आहे. टीसीएसच्या या निर्णयामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसणार आहे.
नक्की वाचा: Accenture Layoffs 2025: 11,000 Employees Fired: AI साठी 11 हजार कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ
NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी म्हटलं आहे की, सदर प्रकरणात केंद्रीय कामगार मंत्रालयाने महाराष्ट्राच्या कामगार सचिवांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. सलुजा यांनी म्हटलंय की TCS ने कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्र वापरून राजीनामा (Voluntary Resignation) देण्यासाठी भाग पाडले आहे. टीसीएसने या कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणे हा कायद्याचा भंग असल्याचा आरोपही सलुजा यांनी केल आहे. या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई न देताच त्यांना कामावरून कमी केल्याचा दावा सलुजा यांनी केला आहे.
टीएसएसने आरोप फेटाळले
TCS ने हे सर्व आरोप 'खोटे' आणि विशिष्ट हेतून प्रेरीत असल्याचे म्हटले आहे. कंपनीमध्ये काही बदल होत असून याबदलांमुळे काही कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असून अशा कर्मचाऱ्यांची संख्या ही फार कमी आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यांना नियमानुसार भरपाई देण्यात आल्याचेही टीसीएसने म्हटले आहे. टीसीएसने जून महिन्यात जगभरातील आपल्या कार्लायातून 12,261 कर्मचारी कमी करणार असल्याचे जाहीर केले होते.